मुंबई MHADA fake website : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट तयार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी पोर्टलद्वारे म्हाडाच्या अर्जदारांकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दोघांना अटक केल्याची माहिती दिलीय. कल्पेश सेवक तसंच अमोल पटेल अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्पेशनं म्हाडाची बनावट वेबसाइट तयार केली होती. तर अमोल अधिकारी बनून नागरिकांना गंडा घालत होता.
दोघांना अटक : म्हाडाच्या 2024 च्या सदनिकाच्या सोडतीसाठी त्यांनी ही वेबसाईट तयार केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अर्जदारांकडून पैसे स्वीकारून नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांच्या पथकानं गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत आरोपी कल्पेश सेवक आणि अमोल पटेल यांना ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नागरिकांना पैसे घेऊन फसवलं : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अधिकृत वेब पोर्टल https://housing.mhada.gov.in/ प्रमाणेच www.mhada.org हे बनावट वेब पोर्टल तयार करून आरोपींनी फसवणूक केलीय. आगाऊ फ्लॅटची जाहिरात करुन त्यांनी अर्जाचे पैसे नागरिकांकडून वसूल केले होते. या प्रकणात कलम 319(2), 318(4) 336(2), 338, 336 (3), 340 (2), 61 सह कलम 66-K, 66-D सह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटाळा कसा उघडकीस आला : लॉटरीसाठी आधीच पैसे भरल्याचा दावा करणाऱ्या एका अर्जदारानं म्हाडा कार्यालयाला भेट दिली. तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला होता. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचे पैसे म्हाडापर्यंत पोहोचले नसून तो पैसे म्हाडाला दिल्याचा दावा करत होता. एवढंच नाही तर घोटाळेबाजांनी अर्जदाराला गोरेगाव पश्चिम येथील एका फ्लॅटमध्ये नेलं होतं. अर्जदाराचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यानंतर https://mhada.org या अधिकृत साइटची नक्कल करणारी बनावट वेबसाइट त्यांनी शोधून काढली.
हेही वाचा