मुंबई Youth Murder Friend : कुर्ला पोलीस ठाण्याजवळील पॅलेस रेसिडेन्सी बारच्या बाहेर 12 ऑगस्टच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृतदेहावरील जखमा पाहून पोलिसांना हत्येचा संशय आला. तपासाअंती गुन्हे शाखेच्या कक्ष 5 ने कल्याण रेल्वे स्थानकावरुन सैफ झहीद अली नावाच्या आरोपीला अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव चक्कन अली (वय 29) आहे. सैफ आणि चक्कन हे दोघे मित्र असून, 7 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गोंडा येथून ते मुंबईत आले होते. दोघेही धारावीतील एका कपड्याच्या कारखान्यात शिलाई कामगार म्हणून काम करत होते. रविवारी रात्री धारावी 90 फिट रोडवर मद्यपान करून हे दोघेही रिक्षानं एल बी एस रोडवरील पॅलेस रेसिडेन्सी बार येथे आले. रिक्षाचं भाडं 30 रुपये झालं होतं. हे 30 रुपये देण्यावरून सैफ आणि चक्कन या दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर सैफनं केलेल्या धक्काबुक्कीत चक्कन जमिनीवर जोरदार पडला आणि डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला.
आरोपी अटकेत : घटनेनंतर मृतदेह टाकून आरोपी सैफ हा कुर्ला येथून दादर रेल्वे स्टेशनला गेला. दादर रेल्वे स्टेशनवरून जलद लोकल पकडून तो कल्याण रेल्वे स्टेशनला पोहचला. कल्याणहून गोरखपूर एक्सप्रेसनं उत्तर प्रदेशातील गोंडाला निघाला असता सोमवारी सायंकाळी 6 वाजता कक्ष 5 च्या पोलिसांनी आरोपी सैफला ताब्यात घेतलं.
हेही वाचा