अमरावती Marriage Ceremony Amravati : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर इथं दोन दिवसांपूर्वी पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आलाय. कारण, लग्नाच्या मंडपात 80 वर्षाच्या नवरदेवाचं आणि 65 वर्षाची नवरीसोबत थाटात लग्न लावून देण्यात आलंय. लग्न कोणी आणि कसं जमवलं, जाणून घ्या....
अनोख्या लग्नाची चर्चा जोरदार : अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर इथं दोन दिवसांपूर्वी पार पडलेला विवाह सोहळा जिल्ह्यात ट्रेंडिंगचा विषय बनलाय. या लग्नाच्या मंडपात चक्क 80 वर्षाचा नवरदेव आणि 65 वर्षाची नवरी हे या सोळ्याचं खास वैशिष्ट्य होतं. विशेष म्हणजे, नवरदेवानं काढलेल्या वरातीमध्ये नवरदेवासोबत चक्क त्याचा पन्नास वर्षाचा मुलगा देखील मस्त नाचत आनंदात सहभागी झाला होता. बापाच्या लग्नात चक्क लेकाचा झिंगाट डान्स यावेळी पाहायला मिळाला. त्यामुळं याची चर्चा तर होणारच ना भाऊ...बातमीचा खरा ट्विस्ट खाली वाचल्यावर कळेल...
अशी आहे या लग्नाची कहाणी : अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या चिंचोली रहिमापूर येथील रहिवासी असणारे 80 वर्ष वयाचे विठ्ठल खंडारे यांच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. चार मुलं, मुली, नातवंड, नात सुना असा नातलगांचा भलामोठा गोतावळा विठ्ठल खंडारे यांच्या सभोवताल होता. मात्र, तरीही ऐन 80 वर्षातही विठ्ठल यांना पत्नीच्या विरहात एकटेपणा टोचत होता. आपल्याला लग्न करायचं, असा विचार त्यांनी आपल्या मुलांपुढं मांडला. सुरुवातीला मुलांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, विठ्ठलराव खंडारे यांचा लग्नाचा हट्ट कायम असल्यामुळं मुलांनी देखील आपल्या वडिलांचं लग्न लावून देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुरू झाला नवरी बघण्याचा कार्यक्रम आणि ते कसं तर वाचा खाली...
कशी शोधली नवरीबाई? : विठ्ठल यांच्या मुलांनी वडिलांसाठी नवरी शोधायला सुरुवात केली. बायोडाटा, दिसायला हॅण्डसम, जॉब, पैसा, फ्लॅट अशा अपेक्ष नवरीबाईला नसल्यानं तसं मुलगी शोधणं थो़डं सोप्प गेलं. पण, वयाचा विचार केला तर तसं नवरी शोधणं अवघ़ड झालं होतं. मात्र, तरीही बापासाठी लेकानं नवरी बघायला सुरुवात केली. बापाचा हट्ट पूर्ण करायचाच, असा निर्धारच जणू काय या मुलांनी केला. अखेर अकोला जिल्ह्यातील अकोट येथील 66 वर्ष वयाच्या महिलेसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय विठ्ठल खंडारे यांच्या मुलांनी घेतला. यानंतर 8 मे रोजी चिंचोली रहिमापूर या गावात विठ्ठल खंडारे यांचा मोठ्या थाटात विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.
बापाच्या लग्नात लेकानं केला डान्स : आपल्या 80 वर्षीय वयाच्या वडिलांचं मोठ्या थाटात लग्न होतंय, या आनंदात विठ्ठल खंडारे यांच्या मुलांनी नवरदेव म्हणून आपल्या वडिलांची गावातून जोरदार वरात काढली. या वरातीत चक्क नवरदेव आणि त्यांचे मुलं एकत्र गाण्यावर थिरकताना दिसले. हे पाहून नातवंडं तरी कसे मागे राहतील, त्यांनीही या वरातीत डान्स करत आनंद व्यक्त केला. चिंचोली रहिमापूर येथील ग्रामस्थ देखील या लग्न सोहळ्यात आनंदानं सहभागी झाले होते. 80 वर्षाचा नवरदेव आणि 65 वर्षाच्या नवरीची चर्चा चिंचोली रहिमापूर गावासह अंजनगाव सुर्जी आणि अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मस्त रंगली होती.
हेही वाचा :