नागपूर Devendra Fadnavis : आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर (OBC) अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनासुद्धा सांगितलं आहे. त्यामुळं त्यांचीही भूमिका तशाच प्रकारची आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोमवारी (29 जानेवारी) नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. वेळ पडल्यास आपण मंत्री छगन भुजबळांशी (Minister Chhagan Bhujbal) बोलू, असंही फडणवीस म्हणाले.
ओबीसींवर अन्याय होणार नाही : जोपर्यत भाजपा सरकारमध्ये आहे, तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसींवर (OBC Reservation) अन्याय होऊ देणार नाही. जर अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही तेव्हा मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेल, पण काहीही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी अन्याय होऊ देणार नाही, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं.
भुजबळ यांच्यासोबत चर्चा करणार : ओबीसींवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, ही भाजपाची भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत मी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील, त्यांनी निश्चित सांगावं. ओबीसींवर कुठेही अन्याय होत असेल तर आपण निश्चितपणे त्यामध्ये परिवर्तन करू, आवश्यक त्या सुधारणा आपण करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता जो घेतलेला निर्णय आहे, तो सरसकट घेतलेला निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल असा तो निर्णय आहे, असंही फडणवीस म्हणाले.
दोन्ही बाजूनं संयम बाळगला पाहिजे : मी ओबीसी समाजाच्या बाजूनं किंवा मराठा समाजाच्या बाजूनं प्रतिक्रिया देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल, असं माझं मत आहे. सरकारची भूमिका बॅलन्स आहे. सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की, सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
मी 'त्या' विषयावर प्रतिक्रिया देणार नाही : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या ही नथुराम गोडसेनं केलेलीचं नाही, असा दावा सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केलाय. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकात त्यांनी हा दावा केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, रणजीत सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात काय दावा केलाय ते मला माहिती नसल्यानं त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही.
हेही वाचा: