मुंबई Maratha Reservation Bill : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षण दिल्याबाबत मराठा समाजाचं अभिनंदन केलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणं महत्त्वाचं असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. ते विभानभवन परिसरात बोलत होते.
विधेयक मंजूर, पण शंका कायम : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असतानाच आज राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका मतानं मंजूर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात राज्यातील तमाम मराठा बांधवांचं अभिनंदन केलंय. त्यांनी यावेळी राज्य सरकारचेही आभार मानले आहेत. पण मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही असाच ठराव एकमतानं मंजूर झाला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री आपला शब्द पाळल्याचं वारंवार सांगत असतील, तर भाजपानं मला दिलेला शब्द पाळला का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यासोबतच मराठा आरक्षण लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलं का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
निवडणुकीच्या तोंडावर दिलं आरक्षण : याआधीही आरक्षणाचा गुलाल उधळला होता. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "मराठा समाजातील सर्व माता-भगिनींना सांगू इच्छितो की, विधेयकाचा अभ्यास करून ते मांडण्यात आलं आहे. त्यादृष्टीनं मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार, असं दिसतंय. यासाठी मराठा समाजानंही जोरदार संघर्ष केला आहे. ज्या क्रूरतेनं मराठा समाजाची डोके फोडण्यात आली, ते चुकीचं होत. शिक्षण, नोकरीत या आरक्षणाचा किती लाभ मिळेल, हे पाहणं बाकी आहे. आधी गुलाल उधळला, आता निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिल्याची टीका ठाकरेंनी शिंदे यांच्यावर केलीय.
मुख्यमंत्र्यांचा इतिहास प्रत्येकाला माहित : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इतिहास प्रत्येकाला माहीत आहे. दिलेलं वचन पूर्ण केल्याचं ते सांगत आहेत. मात्र, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे. दुसरीकडं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयकाला एकमतानं मंजुरी मिळूनही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवल्यानं सरकारची डोकेदुखीही वाढली."
'हे' वाचलंत का :