मुंबई Ashish Shelar On Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर राज्य भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, जरांगे पाटील यांचं वर्तन अशोभनीय असल्याचं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळत "जर यावर कोण राजकारण करत असेल तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत" अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय वास येण्याची परिस्थिती : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो ऐकेरी उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना कोणीही गांभीर्याने बोललं पाहिजे. फडणवीस यांचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठेही गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारा नाही. संविधान आणि कायद्याच्या पलीकडे कधी ते बोलतच नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळत आहोत," असंही ते म्हणाले.
राजकीय सामना करायला आम्ही समर्थ : "समाजामध्ये वितृष्ठ निर्माण होईल, अशा पद्धतीचं वर्तन कुणी करु नये," असंही शेलार यावेळी म्हणाले आहेत. "ज्यांनी आतापर्यंत टिकणार आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलं, ज्यांनी आता उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर 10 टक्क्याचं आरक्षण दिलं. तसंच आजही गृहमंत्री म्हणून आपली जबाबदारी जे योग्य पद्धतीने बजावत आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणं भारतीय जनता पक्षाला कधीच मान्य नाही. आम्ही हे सर्व आरोप फेटाळत आहोत. तसंच याच्यात जर कोणी राजकारण करू पाहत असेल, तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत," असा इशाराच शेलार यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा :
1 शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका
2 "आपला इगो बाजूला ठेवून...", आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले खडे बोल
3 देशाची नाही तर, शरद पवारांच्या पक्षाची परिस्थिती बिकट, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार