धाराशिव Navratri Festival 2024 : नवरात्री सोहळ्याला सुरुवात होत असून देवीचा जागर करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. त्यात बहुसंख्य कुटुंबीयांच कुलदैवत असलेल्या तुळजापूर मंदिर परिसरात एकाच रात्री हजारो मशाली पेटतात. अमावस्येच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी अनेक जिल्ह्यातील हजारो गावातील युवक मंदिरात दाखल होतात. आरती करुन मशाल आपल्या गावी घेऊन जातात, पेटवलेली मशाल नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्याची अनोखी प्रथा आहे. वर्षभरात हा एकच दिवस या मशाली पेटवल्या जात असून प्राचीन काळापासून ही प्रथा असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.
अनेक गावांमध्ये नेतात पेटवलेल्या मशाली : नवरात्री महोत्सवाला सुरुवात होत असताना घटस्थापनेच्या रात्री मशाल पेटण्याची अनोखी प्रथा आहे. कुलस्वामिनी तुळजा भवानी माता ही मराठवाड्यासह राज्यातील अनेकांचं कुलदैवत आहे. आसपासच्या गावात घटस्थापना करताना तुळजा भवानी मातेच्या मंदिरातून मशाल पेटवून गावी नेण्याची प्रथा आहे. अमावस्येच्या दिवशी रात्री म्हणजेच घटस्थापना होण्याच्या आदल्या रात्री प्रथा परंपरेनुसार युवक गावातून ढोल ताशा वाजवत रिकामी मशाल घेऊन तुळजापूरला प्रस्थान करतात. मंदिर आल्यावर मशालीचं विधिवत पूजन करुन ती पेटवली जाते. त्यानंतर त्याच मशालीनं देवीची आरती आणि पूजन केलं जाते. पेटवलेली मशाल हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात पायी अंतर कापून गावात नेली जाते. त्यानंतरच त्या गावातील नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते. पुढं नऊ दिवस ही मशालीतील ज्योत अखंड प्रज्वलित ठेवण्याची प्रथा आहे.
प्राचीन काळापासून सुरू आहे प्रथा : तुळजापूर मंदिरातून एका रात्रीत हजारो पेटलेल्या मशाली बाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात हातात मशाल घेऊन युवक मार्गस्थ होताना दिसतात. मंदिरातील पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हजारो वर्षांची ही परंपरा आहे. तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या गावातील हजारो भाविक दरवर्षी घटस्थापनेच्या आधी मंदिरात दाखल होतात. पेटलेल्या मशाली घेऊन ती ज्योत गावात नेल्यावर त्याठिकाणी घटस्थापना केली जाते. काही ठिकाणी नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड ज्योत सुरू ठेवण्याची तर काही ठिकाणी देवीची पूजा करून ज्योत शांत करण्याची प्रथा आहे. त्या त्या गावाच्या मान्यतेनुसार परंपरा आजही कायम आहे," अशी माहिती मंदिरातील पुजारी प्रशांत झाडपिडे यांनी दिली. तर गावातील युवक ही प्रथा पुढं नेतात, बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील छोट्या गावातून आलेल्या प्रकाश मांडवे या युवकानं दिलेल्या माहितीनुसार, "जवळपास दीडशे किलोमीटर पायी जाऊन गावात ज्योत घेऊन जाण्याची प्रथा आहे. त्यादरम्यान कितीही पाऊस आला, तरी न थांबता ही मशाल गावी नेत असून गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते," अशी माहिती त्यानं दिली.
मशालींची होते विक्रमी विक्री : गावात मशाल ज्योत पेटवून नेण्याची प्रथा आहे. त्यात काही गावातून मंदिरातील मशाल घेऊन येण्याची तर काही ठिकाणी नवीन मशाल घेऊन त्यात ज्योत पेटण्याची प्रथा आहे. यातून हजारो मशालींची विक्री त्यानिमित्तानं होते. वर्षातून नवरात्रीच्या एक दिवस आधी असलेल्या दिवशीच ज्योत पेटवून गावी नेण्याची प्रथा असल्यानं या दिवशी मोठ्या प्रमाणात मशाल विक्री होते. साधारणतः 250 रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत मशालीचा आकार आणि प्रकारानुसार विक्री केली जाते. त्यात पाचशे ते आठशे रुपयांमध्ये विक्री होत असलेल्या मशालीला अधिक पसंती भाविक देत असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली.
मध्यरात्री एक वाजता देवी होते सिंहासनावर विराजमान : "आराध्यदैवत आई तुळजाभवानी मंदिरात रात्री बारा वाजता निद्रावस्थेत असलेल्या देवीच्या पूजेला सुरुवात होते. मध्यरात्री एक वाजता विधिवत पूजन करून तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होते. त्यानंतर भक्तांसाठी मंदिर खुले होते. पुढील नऊ दिवस मंदिर फक्त मध्यरात्री दोन तासांसाठी बंद होते. देवीच्या घटस्थापनेच्या पूर्वी महिला - कुमारिका मंदिर परिसर स्वच्छ धुतात, त्यानंतरच सोहळ्याला सुरुवात होते," अशी माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.
हेही वाचा :
- नवरात्रीला सुरूवात, 'या' राशींवर राहणार दुर्गा देवीची कृपा, सोन्यासारखं चमकणार नशीब, वाचा राशीभविष्य - Horoscope 03 october 2024
- शारदीय नवरात्री 2024: करवीर निवासिनी अंबाबाईला सोन्याचा मुलामा दिलेली 'प्रभावळ' अर्पण - Navratri 2024
- भाजपातर्फे मुंबईत 'भव्य मराठी दांडियाचं' आयोजन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दांडियाच्या माध्यमातून मतांचा जोगवा? - Navratri 2024