पुणे Pollution In Indrayani River : देहूगावातील इंद्रायणी नदीत पुन्हा शेकडो मासे मृत झाले आहेत. अवघ्या तेरा दिवसावर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येऊन ठेपलाय. या पालखी सोहळ्याला देहूत राज्यातून लाखो वारकरी दाखल होतात. लाखो वारकरी त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र या इंद्रायणी नदीत प्रदूषण वाढल्यानं शेकडो मासे मृत झाले आहेत. या मृत माशांचा खच इंद्रायणी नदीच्या डोहात तरंगत आहे. त्यामुळे देहूतील पर्यावरण प्रेमींनी देहू नगर पंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. या पर्यावरण प्रेमींनी हे मृत मासे एकत्र करुन त्यांच्यावर अंतिम संस्कार केले.
इंद्रायणी नदीतील जलप्रदूषण : इंद्रायणी नदीतील पाण्यात जलप्रदूषणामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) येतो. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात आलं आहे. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या देहूतील पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचं ग्रहण लागलं. देहूतील इंद्रायणी नदीत शेकडो मृत मासे आढळून आल्यानं नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. मृत माशांपासून पर्यावरण प्रेमींनी नदी प्रदूषण रोखण्याकडं शासनाचं लक्ष वेधलं. वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देहूतील स्थानिक नागरिक आणि रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा मसूडगे यांनी दिला आहे.
प्रशासनानं घेतली प्रदूषणाची दखल : इंद्रायणी नदीत मृत मासे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनानं दखल घेतली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी आरती डोळस यांनी तत्काळ देहू नगरपंचायत मुख्याधिकारी नीलम घार्गे यांच्या समवेत घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना तसेच नदी प्रदूषित ठिकाणचे पाणी नमुने घेतले. यावेळी देहू नगरपंचायतीचे अभियंता संघपाल गायकवाड उपस्थित होते. यावेळी मसूडगे यांनी येथील नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली. देहूतील काही ठिकाणचं पाणी थेट नदीत सोडू नये. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपीमध्ये नेण्यासाठी योग्य त्या दक्षता घेण्याची त्यांनी मागणी केली. जलप्रदूषण वाढलं असून नदीत पाणी नसल्यानं माशांचा जीव गेला. यात विविध प्रकारच्या माशांचा समावेश आहे. जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी देहूतील इंद्रायणी नदी काठावर भेट देऊन पाहणी केली.
सांडपाणी थेट नदीत सोडलं जातं : "देहूत कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मृत झाले. यामध्ये दुर्मीळ झालेल्या महासीर माशांचाही समावेश आहे. यावेळी प्रशासनानं चाचणी करण्यास पाण्याचे नमुने घेतले आहेत. 27 मार्चला श्री संत तुकाराम बीज आहे. या पार्श्वभूमीवर येथे मृत झालेले मासे आढळून आले आहेत. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेऊन नदीचं प्रदूषण रोखण्यासह इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात वरुन पाणी सोडण्याची यावं. तुकाराम बीज सोहळ्यास लाखो भाविक येणार असून त्यापूर्वी उपाययोजना करण्यात यावी," अशी मागणी आबा मसुडगे यांनी केली आहे.
हेही वाचा :