नाशिक Manoj Jarange Patil In Nashik : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज (8 फेब्रुवारी) नाशिक दौऱ्यावर असून त्यांचे नाशिक शहरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना "जशी तुमची लेकरं आहेत, तशी आमची पण आहेत, तुम्ही जगा आणि आम्हाला जगू द्या, मात्र आमच्या आरक्षणाला आडवे याल तर मंडळ आयोगाला चॅलेंज करावा लागेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
छगन भुजबळ यांना समजवावे : यावेळी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ तीन वेळा आलेत, आता त्यांनी ते सोडून द्यावे, ओबीसी समाजानं छगन भुजबळ यांना समजवावं, अन्यथा आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागेल. येत्या 10 फेब्रुवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहोत." तसंच सरकारने सांगितल्याप्रमाणे सगे-सोयरे आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी. याशिवाय मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी आपली मागणी होती त्याचीही पूर्तता झाली नाही त्यामुळं हे उपोषण करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
नाशिकचं पाणीच तसं आहे : नवी मुंबईत विजयोत्सव साजरा केला, मग आता मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची वेळ का आली? अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "राज ठाकरे यांच्या पाठीशी देखील मराठा समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, ते असं कधीच बोलत नाहीत, नाशिकला आल्यावर ते बोलले. नाशिकच पाणीच तसं आहे, ते तेवढ्यापुरतं बोलले असतील, आता त्यांची भूमिका बदलेल."
जरांगे पहिल्यांदाच कसमादे भागात : 8 फेब्रुवारीला सकाळी सात वाजेच्या आसपास जरांगे पाटील हे नाशिकहून वणी गडावर जातांना त्यांनी मराठा समाज बांधवांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ते दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा तालुक्यात हजारो माता, भगिनी आणि समाज बांधवांना भेटणार आहे. त्यामुळं या भागात उत्साहाचं वातावरण आहे, पहिल्यांदाच कसमादेच्या भूमीत जरांगे पाटलांचं आगमन होत असल्यानं या भागातील समाज बांधवांनी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
हेही वाचा -