मुंबई Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आणि बचावासाठी आपण लढत आहोत, हाच आपला अजेंडा आहे. (OBC Reservation) मनोज जरांगे पाटील हे स्वतःला खूप ज्ञानी समजत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला (Mandal Commission) आव्हान द्यावं असं थेट आव्हानच मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
हा तर ओबीसी समाजावर अन्याय : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आता कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्यात सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख झाल्यानं ही व्याप्ती आता अधिकच वाढणार आहे; मात्र हे सर्व कायद्याच्या विरोधात आहे, अशी आपली आजही ठाम भूमिका आहे आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवून ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावं, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
जरांगे देशात सर्वांत ज्ञानी : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांच्या इतका भारतात कोणीही ज्ञानी पुरुष सध्या नाही. त्यांनी मुंबईत तीन कोटी मराठा येणार असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात किती लोक आले हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. जरांगे यांना कोटी आणि लाख यातलासुद्धा फरक समजत नाही, असं सांगून मराठा समाजानं गावोगावी या अधिसूचनेनंतर उत्सवाच्या नावाखाली उन्माद सुरू केला आहे, असं भुजबळ म्हणाले.
आमचं आंदोलन सुरूच राहणार : आता राज्यातील सर्व ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना या आरक्षण प्रश्नावर आक्रमक झाल्या आहेत. आम्ही सर्व ओबीसी संघटनांनी एक तारखेला सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन आम्ही यानिमित्तानं सर्वांना करणार आहोत. तर येत्या तीन तारखेला अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी समाजाचा मोठा मेळावा घेणार असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्य सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षण अधिसूचनेबाबत सर्व ओबीसी समाजातील लोकांनी सोळा तारखेपर्यंत लाखोच्या संख्येनं हरकती नोंदवाव्यात असं आवाहनही पुन्हा एकदा भुजबळ यांनी यावेळी केलं.
वडेट्टीवारांच्या भूमिकेबाबत बोलणार नाही : ओबीसी आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी आधी आमच्या भूमिकेचं समर्थन केलं. ते आमच्या सोबत होते; मात्र अचानक त्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेऊन वक्तव्य करायला सुरुवात केली. आता पुन्हा एकदा जर त्यांना आमची भूमिका पटत असेल तर त्याबाबत सध्या तरी मला काहीही बोलायचं नाही, असं भुजबळ म्हणाले.
हेही वाचा: