मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मणिशंकर अय्यर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. २०१२ मध्ये मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते. तसे न झाल्यानं यूपीए सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या "अमॅव्हरिक इन पॉलिटिक्स" या पुस्तकात व्यक्त केलं आहे.
- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचे वैयक्तिक मत असू शकतं, असं सांगितलं आहे.
मणिशंकर अय्यर यांनी पुस्तकात काय म्हटलं?- २०१२ मध्ये मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदी कायम ठेवून प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आले. या निर्णयामुळे तिसऱ्यांदा यूपीए सरकार स्थापन होण्याची शक्यता संपुष्टात आली असल्याचे मत मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या 'अमॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या पुस्तकात म्हटलं आहे. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यावर तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) धुरा सोपवायला हवी होती. जर का असे झाले असते तर यूपीए सरकारचा कारभार हा अर्धांगवायूच्या अवस्थेत पोहोचला नसता, असा पुस्तकात दावा करण्यात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अनेकदा बायपास सर्जरी करावी लागली होती. ते शारीरिकदृष्ट्या पूर्णतः खचलेले असल्याने त्यांच्या कामाचा वेग सुद्धा मंदावला होता. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यासुद्धा आजारी पडल्या. या कारणानं पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोन्ही कार्यालयांमध्ये गतीचा अभाव दिसून आला. त्याचा फटका यूपीएला बसला, असा मणिशंकर अय्यर यांनी दावा केला.
एकटे मनमोहन सिंग जबाबदार आहेत का? मणिशंकर यांच्या दाव्यावर ईटीव्ही भारतशी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मी ते अजून वक्तव्य पाहिलेलं नाही. त्यावर सहमत नाही. ते चुकीचं आहे". यूपीएच्या कार्यकाळात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी होती. त्याबाबत विचारले असता ईटीव्ही भारतशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चव्हाण म्हणाले, " "२०१० नंतर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रिपद माझ्याकडे नव्हते. यूपीए-२ मध्ये तिथं फक्त एक वर्ष होतो. २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात १४५ वरून २०६ खासदार झाले. कम्युनिस्टशिवाय आमचे सरकार आले. २०१४ साठीचे त्यांचे (मणिशंकर) वक्तव्य वैयक्तिक असू शकते. त्या कालखंडात मी नव्हतो. बऱ्याच घटना घडल्या होत्या. त्यासाठी एकटे मनमोहन सिंग जबाबदार आहेत का? राहुल गांधी की मनमोहन सिंग नेतृत्व करत आहेत, याबाबत तेव्हा संभ्रम होता. २०१४ मध्ये मनमोहन सिंग नव्हे तर राहुल गांधी हे नेतृत्व करत होते".
माझ्या आयुष्यातील मोठी अडचण- अय्यर यांनी एका मुलाखतीत सोनिया गांधींशी निगडित एक किस्सा सुद्धा सांगितला आहे. अय्यर म्हणाले, “एकदा त्यांनी सोनिया गांधी यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्यावर सोनिया गांधी यांनी मी ख्रिश्चन नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अय्यर यांनी त्यांचे शब्द मागे घेतले. कारण सोनिया गांधी यांना स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेणे कदाचित आवडत नसावे, हे त्यांना कळले.” तसेच दशकभरात सोनिया गांधींशी समोरा-समोर चर्चा करण्याची एकही संधी मला नाही, अशी माहिती अय्यर यांनी दिली. राहुल गांधींसोबत एक प्रसंग वगळता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याचीही संधी मिळालेली नाही. तर प्रियांका गांधी यांच्यासोबत दोन प्रसंगादरम्यान संवाद साधता आला असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच माझ्या आयुष्यातील मोठी अडचण आहे. माझी राजकीय कारकीर्द गांधी कुटुंबाने घडवली आणि बिघडवलीदेखील आहे. असे जरी मी म्हटले तर वावगे ठरणार नाही, असा टोलाही मणिशंकर अय्यर यांनी गांधी कुटुबाला लगावला आहे.
मणिशंकर अय्यर यांनी आता नातवंडांसोबत खेळावं- काँग्रेस नेते, आमदार अभिजीत वंजारी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर टीका केली.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, " मणिशंकर अय्यर यांचं आता फार वय झालं आहे. वय झाल्यावर म्हातारे चाळे सुरू होतात. तसं त्यांच झालं आहे. त्या कारणानं आता जर तरची भाषा वापरून वातावरण खराब करण्यापेक्षा त्यांनी शांत राहावं. घरी बसून आपल्या नातवंडांसोबत खेळावं, अशी माझी त्यांना सदिच्छा आहे. यासोबतच काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी. असे केल्यानं नवीन दमानं काम करणारे कार्यकर्त्यांचा निरुत्साह होणार नाही, असंही वंजारी म्हणाले आहेत".