नागपूर Mango Millet Festival Nagpur 2024 : पुणे इथं झालेल्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर नागपूर शहरात सुद्धा आंबा, तृणधान्य आणि धान्य महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. 19 मेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले. महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथं आंबा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांचे 40 ते 50 स्टॉल्स आहेत. तृणधान्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन, कोकणातील हापूस, केशर आणि इतर आंबा प्रदर्शन आणि विक्री यावर आंबा महोत्सवात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आंबा महोत्सवात देवगडचा हापूस ते गडचिरोलीचा 'गोला' : कोकणातल्या देवगड हापूस आंब्यापासून थेट गडचिरोली जिल्ह्यातील जीवनगट्टा गावच्या ‘गोला’या देशी आंब्यापर्यंत आंबे या महोत्सवात आहेत. त्यासह खान्देशच्या ज्वारीच्या लाह्यापासून वर्धा आणि नागपुरातील केसर, दशेरी ते सफेदापर्यंतची वैविधता ‘आंबा मिलेट धान्य महोत्सवाचे’ वैशिष्टय ठरलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशानं आंबा मिलेट धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हापूसच्या रांगेत गोला आंबा : देवगडचा हापूस आंबा सुप्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या जोडीनं गडचिरोलीतील दुर्गम आदिवासी गाव असलेल्या जीवनगट्टा या गावात गोला हा आंबा देशी आंबा विकसित झाला. त्यामुळे देवगडच्या हापूसच्या पंगतीत गोला हा आंबा बसवणारी प्रणाली गावडे या तरुणीचं विशेष कौतुक होत आहे. प्रणाली गावडे ही तरुणी जीवनगट्टा या गावात राहणारी आहे. कृषी पदवी संपादन करुन प्रणाली गावडे या तरुणीनं आपल्या कौशल्यावर वैविध्यपूर्ण आंबाडी, टोमॅटो, लसून लोणच्यासह गावातील देशी गोला आंब्याला हापूसच्या रांगेत आत्मविश्वासानं बसवलं आहे. गावची ती पहिलीच महिला कृषी पदविधारक आहे. प्राणालीच्या आईनं स्थापन केलेल्या आदिवासी महिला बचत गटाला आता कृषी शिक्षणाची जोड देवून मूल्यवृद्धी कशी करता येईल, याचा प्रणाली प्रयत्न करत आहे.
अन्न प्रक्रियेला शास्त्रोक्त प्रक्रियेची जोड : आदिवासी महिलांकडून पारंपारिक चालत आलेल्या कौशल्यावर आधारित अन्न प्रक्रियेला आता थोडं शास्त्रोक्त प्रक्रियेची जोड देण्यात येत आहे. नैसर्गिक स्वरुपातच आंबाडी, टोमॅटो यांचं लोणचं, आवळा प्रक्रिया केलेले सिरप, मँगो ज्यूस असे मोजके उत्पादनं घेऊन स्टॉल घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रणाली गावडे हिनं दिली. "या उपक्रमातून एक नवा आत्मविश्वास मी अनुभवत असून तो आमच्या जीवनगट्टामधील इतर महिलांपर्यंत घेऊन जाईल," असा विश्वास प्रणालीने दाखविला. रानभाज्यांसह इतर उत्पादनं तिनं विक्रीला ठेवली आहेत.
आंब्याच्या जाती आणि चव जाणून घ्या : या महोत्सवात एकूण 57 स्टॉल्स आहेत. यातील 25 स्टॉल्स आंब्याचे आहेत. 32 स्टॉल्स मिलेट धान्य पदार्थाचे आहेत. वरुडच्या प्रशांत वेखंडे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवलेले दशेरी, लड्डू, लंगडा, सफेदा, चौसा ही नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे विक्रीस ठेवले आहेत.
हेही वाचा :
- Mangoes Exported : बारामतीतून निर्यात होणाऱ्या आंब्याची अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला भुरळ
- Hapus Mangoes : हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; 'असा' ओळखा ओरिजनल हापूस
- Sale of Hapus Mangoes: यंदा हापूस आंबा विक्रीतून विक्रेत्यांनी कमावले तब्बल ४०० कोटी; निर्यातीमुळे पीक कमी येवूनही वाढले उत्पन्न