ठाणे Dombivli Sexual Assault Case : राज्यात बदलापूर लैगिंक अत्याचाराचं प्रकरण गाजत असतानाच अंबरनाथनंतर आता डोंबिवली पूर्वेतील एका गावात शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलासोबत घरात खेळायला आलेल्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्यात. धर्मेंद्र यादव असं अटक करण्यात आलेल्या नराधमाचं नाव आहे.
पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात राहते. तर धर्मेंद्र यादव हा देखील याच परिसरात राहतो. पीडित मुलगी नेहमीप्रमाणं काही मुलांसह आपल्या शेजारी राहणाऱ्या धर्मेंद्र यादवच्या मुलासोबत 24 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास खेळायला गेली. त्यावेळी धर्मेंद्रनं मुलीला एका खोलीत आपल्याजवळ बोलून घेतलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
नराधमाला ठोकल्या बेड्या : त्यानंतर पीडित मुलीनं धर्मेंद्र यादवच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करत आपलं घर गाठलं आणि घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी त्वरित मुलीसोबत मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं. घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, तासाभरातच नराधमाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या घटनेमुळं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
7 दिवसाची पोलीस कोठडी : वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव याला 25 ऑगस्ट रोजी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता. न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच नराधम धर्मेंद्र यानं या पीडित मुलीसह आणखी काही मुलींसोबत असा प्रकार केला आहे का ? या दृष्टीनं पोलीस पुढील तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -