लोणावळा ( पुणे) : Maharashtra Congress Training Camp : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात गळती लागल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. लोणावला येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आज शुक्रवार (दि. 16 फेब्रुवारी)रोजी या शिबिराचं उद्घाटन झालं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे उद्घाटन केलं. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकांऱ्यांना मार्गदर्शन केलं.
इतर पक्षांत गेलेल्यांवर जोरदार टीका : काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केलाय. 'कहूं तो मां मारी जाए, न कहूं तो बाप कुत्ता खाए' अशी जुनी म्हण उद्धृत करून खर्गे म्हणाले की, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. "सर्व काही दिलं गेलं. त्यांनीच घर सोडलं." गेल्या काही दिवसांत मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे त्यावरून खर्गे यांनी जोरदार टीका केलीय. "आपल्या सर्वांना लोकसभा निवडणुकीत सहभागी व्हायच आहे. तसंच, त्यासाठी एकदिलानं काम करायचं आहे. आता ते खूप कठीण झालं आहे. जे आमच्यासोबत आहेत ते या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत. तुम्ही लोक तळागाळातील कार्यकर्ते आहात. तुम्ही आम्हाला इतकी मोठी शक्ती दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे."
झुठो के सरदार : "मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात मीपणा जास्त असतो. सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती. दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या. या मोदी गॅरंटीचं काय झालं? असा सवाल करत नरेंद्र मोदी हे झुठो के सरदार आहेत, असा टोला खर्गेंनी यावेळी लगावला.
हेही वाचा :
1 मराठा समाजाची फसवणूक केल्यानं मुख्यमंत्र्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार - संजय लाखे पाटील
2 राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपाची चालणार सत्ता, हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड
3 जेईई'च्या निकालानंतर मुलगा बेपत्ता! संपर्क होत नसल्यानं आईची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट