मुंबई Lok Sabha Elections : देशात अबकी बार 400 पार तसंच राज्यात 45 पार असा नारा देणाऱ्या महायुतीच्या जागावाटपाचं अडकलेलं घोडं अद्याप सुटता सुटत नाही. भाजपानं 20 जागा घोषित करून दहा दिवस उलटले, तरी उर्वरित 28 जागावाटपांचा तिढा सुटत नाही. विशेष म्हणजे, 28 जागांमध्ये भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट तसंच महायुतीत नव्याने समाविष्ट होऊ पाहत असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचाही समावेश आहे. अशात जागा वाटपात मनासारखे मतदारसंघ न भेटल्यास नाराज उमेदवारांच्या बंडखोरीचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाल्यास उचित कारवाई करण्याचे संकेतही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
राज ठाकरेंच्या एन्ट्रीनं जागा वाटपाचा तिढा वाढला : भाजपानं एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन शिवसेनेत उभी फूट पाडली. त्या पाठोपाठ अजित पवारांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उभी फूट पाडली. या फोडाफोडीच्या राजकारणानंतर भाजपाचा राज्यातील आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासच्या जोरावरच भाजपानं राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मदतीनं लोकसभेच्या एकूण 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजपानं तशी रणनीतीसुद्धा आखली असून जागा वाटपामध्ये भाजपा सिंहाचा वाटा घेणार आहे. भाजपानं राज्यातील एकूण 48 जागांपैकी आतापर्यंत स्वतःच्या 20 जागा घोषित केल्या आहेत. परंतु उर्वरित 28 जागांवर अजूनही पेच कायम आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या 18 जागा निवडून आल्या होत्या. यामुळं एकनाथ शिंदे गटानं पूर्वीपासून 18 जागांवर दावा केला आहे. तर, अजित पवार गटाने 8 जागांची मागणी केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता भाजपाच्या दबावतंत्रात शिंदे गटाला जेमतेम 8 ते 10 जागा, अजित पवार गटाला 3 ते 4 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीत एन्ट्री केल्यास त्यांनाही एक किंवा दोन जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यासुद्धा शिंदे गटाकडून सोडवल्या जाण्याची शक्यता जास्त आहे.
नाराज नेत्यांची यादी मोठी : भाजपानं संपूर्ण देशाबरोबर राज्यातही प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास केला आहे. त्या कारणानं शिवसेनेच्या 18 जागांपैकी आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं विद्यमान 13 खासदार असतानासुद्धा सर्व जागा भाजपा त्यांना द्यायला तयार नाही. कोल्हापूरचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना भाजपानं उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागेवर भाजपाकडून समरजित घाडगे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. दुसरीकडं हातकणंगलेचे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट करून भाजपा तिथे दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक असून साताऱ्याची जागा भाजपा अजित पवार गटाला देण्याच्या तयारीत असल्याकारणानं उदयनराजे नाराज आहेत. तर, म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपानं विद्यमान खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपानं विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाचा विरोध ओढून घेतला आहे. त्याचप्रमाणे परभणीत भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनी उमेदवारीवर दावा केला असताना ही जागा भाजपाकडून अजित पवार गटाला सोडली जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, अडसूळांच्या विरोधात लढलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपानं उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यानं अडसूळ नाराज आहेत. नाशिकमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून भाजपा दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्यानं गोडसे नाराज आहेत.
नारायण राणे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह : रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत किरण सामंत यांच्याबाबत चित्र स्पष्ट होत, नाही तोपर्यंत नारायण राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं धोक्याचं ठरू शकतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघसुद्धा भाजपा आपल्याकडं घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी पाच जागेवर भाजपा आपले उमेदवार उभे करत आहे. या सर्व कारणांनी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीय. त्यामुळं बंडखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे. अशाप्रसंगी बंडखोरांवर उचित कारवाई करण्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
फडणवीसांचा सागर बंगला केंद्रबिंदू : महायुतीच्या जागा वाटपाच्या या चढाओढीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शासकीय सागर बंगला निवडणुकीचं केंद्रस्थान बनला आहे. दररोज नाराज उमेदवारांची रीघ देवेंद्र फडवणीस यांच्या बंगल्यावर लागली आहे. अनेक मतदार संघातील इच्छुक त्याचबरोबर नाराज खासदार फडवणीस यांची भेट घेत आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळं भाजपाचे आमदार राम शिंदे नाराज आहेत. राम शिंदे यांच्या नाराजीचा फटका सुजय विखे पाटील यांना बसू शकतो. म्हणून राम शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानं भाजपा नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यवतमाळ - वाशिमच्या विद्यमान खासदार शिंदे गटाच्या भावना गवळी यांचाही पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. मंत्री संजय राठोड यांनीही यासंदर्भामध्ये देवेंद्र फडवणीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत जागा वाटपातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडवणीस मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असले, तरी त्यांच्या प्रयत्नांना कुठे यश तर कुठे अपयश येताना दिसत आहे.
हे वाचलंत का :
- विरोधी पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक - Appointment of detectives
- अभिनेता गोविंदा हाती घेणार धनुष्यबाण?; उत्तर पश्चिम मतदारसंघातून गोविंदा यांना उमेदवारी? - Govinda join Shiv Sena
- शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटाळा? ८० कोटीची दलाली घेतल्याचा रोहित पवारांचा सरकारवर थेट आरोप - Rohit Pawar Allegations