नाशिक Mahashivratri 2024 : महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. किमान पाच लाख भाविक इथं दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीनं देवस्थान ट्रस्टनही शुक्रवारी पहाटे चार वाजतापासून ते शनिवारी रात्री नऊ वाजतापर्यंत सलग मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. "गर्दीमुळे रांगेतून भाविकांना दर्शनासाठी किमान चार तास तर दोनशे रुपयांच्या पेड पासद्वारे किमान दोन तास लागू शकतील," असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला. महाशिवरात्रीचं निमित्त साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतलं.
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन : महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 4 वाजतापासून मंदिरात महादेवाची विशेष महापूजा तसेच आरती करण्यात आली. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं, यासाठी शुक्रवारी पहाटे चारपासून ते शनिवारी रात्री नऊ वाजतापर्यंत सलग मंदिर खुलं राहणार आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे.
भाविकांसाठी विविध सुविधा : श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करुन सजवण्यात आलं आहे. मंदिराचं गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली. येणाऱ्या भाविकांची सोय भव्य दर्शन मंडपातून आणि त्याच्या दोन्ही विंगमधून करण्यात आली आहे. दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. दर्शनाला वेळ लागू नये, यासाठी लगेच दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन सुरु करण्यात आलं आहे. भाविकांसाठी सर्व सुविधा देत दर्शन मंडप तयार करण्यात आला आहे.
राज ठाकरेंनी घेतलं काळाराम मंदिरात दर्शन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. राज ठाकरे यांनी मंदिराला भेट दिल्यानं मंदिर परिसरात अनेक भाविकांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली.
तीन दिवस सलग सुट्ट्या : "शुक्रवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी तर शनिवारी आणि रविवारचा वीकेंड यामुळं अनेक संस्थांमध्ये सलग तीन दिवस सुट्टी आहे. याचाही परिणाम त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गर्दी वाढण्यात होणार आहे. त्यामुळं अर्थकारणाला गती मिळून मोठी उलाढाल होणार आहे," असं त्र्यंबकेश्वर संस्थांच्या विश्वस्तांचं मत आहे.
हेही वाचा :
- Trimbakeshwar Temple news : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार
- राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; काळारामाचं दर्शन घेत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार
- VIP Darshan At Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन 'या' तारखेपर्यंत बंद; जाणून घ्या कारण...