मुंबई Maharashtra Weather Update : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
आज कुठे बरसणार? : आज, रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, धुळे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
बळीराजाला मिळणार दिलासा : गेल्या काही दिवसांपासून पावसानं दांडी मारल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळं नागरिकांवर ऐन पावसाळ्यात घामानं ओलं होण्याची वेळ आली होती. आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. राज्याच्या ग्रामीण भागात पावसानं दांडी मारल्यानं शेतकरी देखील चिंताग्रस्त झाल्याचं चित्र आहे.
मुंबई, ठाण्यात पाऊस नाही : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आणखी काही दिवस करावी लागेल. परिणामी, त्यांना आणखी काही दिवस उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतील. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकेल. मुंबई आणि परिसरात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला. ऑगस्टच्या सुरुवातीला काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. मात्र, जुलैप्रमाणे या महिन्यात मुसळधार पाऊस पडलेला नाही. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मात्र, त्यात म्हणावा तसा जोर नव्हता. दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्याच्या परिणामी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा