मुंबई- राज्य विधान परिषदेतील चार जागांची मुदत येत्या सात जुलैला संपत आहे. यातील दोन जागा पदवीधर मतदारसंघातील आहेत. तर दोन जागा या शिक्षक मतदार संघातील आहेत. मुंबई पदवीधर मतदार संघातील विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत संपत आहे. तर शिक्षक मतदार संघातून मुंबई विभागातून कपिल पाटील यांचा तर नाशिक विभागातून किशोर दराडे यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपतो आहे. त्या निमित्तानं निवडणूक आयोगानं या चार जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे.
शिक्षक मतदारसंघात जोरदार हालचाली- पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार कोण असणार? हे अजून गुलदस्तात असले तरी शिक्षक मतदारसंघातून आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उमेदवारी सहकारी सुभाष मोरे यांना दिली आहे. शिक्षक मतदारसंघांमध्ये आमदार कपिल पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणूक रंगणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीचे असे आहे वेळापत्रक
- निवडणुकीची अधिसूचना 15 मे रोजी लागू होत आहे.
- 22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे.
- 24 मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 27 मेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
- 10 जून रोजी मतदान होणार आहे.
- 13 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीत कोणाची नावे चर्चेत आहेत?- शिक्षक मतदारसंघामध्ये माजी शिक्षण संचालक ज. मो. अभ्यंकर शिक्षक सेनेचे उमेदवार आहेत. तर शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्यावतीने सुभाष मोरे निवडणूक लढविणार आहेत. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा महाविकास आघाडीत समावेश असला तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्याचबरोबर शिवनाथ दराडे, अनिल बोरनारे, ज्ञानेश्वर हांडे, धनंजय गजरे, राजू बंडगर आणि तानाजी कांबळे अशी काही नावे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला चर्चेत आहेत. पदवीधर मतदारसंघातून डॉ. दीपक सावंत, वरुण सरदेसाई, आमदार अनिल परब या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण असणार? याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारच ठरवतील, असे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं.
मतदारांशी संपर्क साधणे कठीण - कपिल पाटील- अल्पकाळात मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधण्याचं उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, " सुट्टीच्या काळात निवडणूक असल्यानं अनेक मतदार गावाला गेले आहेत. त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम दिसून येईल. मतदार कमी होण्याची शक्यता आहे. पण निवडणूकीत आमचे उमेदवार सुभाष मोरे बाजी मारतील", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक कर्तव्यावर असल्यानं 21 मे नंतरच शिक्षक गावी किंवा पर्यटनाला जातील. यामुळे मतदान अल्प होईल," अशी प्रतिक्रिया वरिष्ठ शिक्षक विजय अवसरमोल यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-