मुंबई Maharashtra Rain News : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी (25 जुलै) मुंबईच्या अनेक भागात 150 मिमीच्या पुढं पावसाची नोंद झालीय. या पार्श्वभूमीवर आज (26 जुलै) हवामान विभागानं मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय. गुरुवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पालिकेनं दुपारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर काही प्रमाणाl ओसरला आणि हवामानशास्त्र विभागानं देखील मुंबईला आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यामुळं पालिका प्रशासनानं आपला सुट्टीचा निर्णय मागं घेत सर्व शाळा नेहमीप्रमाणेच सुरू राहतील, असं जाहीर केलंय.
13 विमानं रद्द : गुरुवारी मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम मुंबईतील विमानसेवा आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 13 विमानं रद्द करण्यात आली तर एकूण 114 विमानं विलंबानं होती. तर पावसामुळं तब्बल 60 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती गुरुवारी सायंकाळी रेल्वे प्रशासनानं दिली.
हवामान विभागाचं म्हणणं काय ? : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश इथं समुद्रसपाटीपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याव्यतिरिक्त अरबी समुद्रातून येणारे पश्चिमी वारे देखील अधिक झाले असून, याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. राज्यातील किनारपट्टी भागावर या नैसर्गिक बदलांचा परिणाम गुरुवारी दिसून आला. तर, रत्नागिरी, रायगड सातारा या भागात हवामानातील या बदलांचा परिणाम आज देखील दिसून येईल, असं हवामान विभागानं म्हटलंय.
वाहतूक सुरळीत सुरू : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी मॅनहोलची झाकणं उघडून पाण्याचा निचरा करण्याची वेळ पालिकेवर आली होती. पाणी साचल्यानं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित झाली. मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहनांचा वेग मंदावला होता. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर मंदावल्यानं आज शुक्रवार सकाळी पहाटेपासून रस्ते वाहतूक, उपनगरी रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
हेही वाचा -
- मुसळधार पावसामुळं हवाई वाहतूक विस्कळीत; मुंबई विमानतळावरील उड्डाणं रद्द, प्रवाशांना फटका - Heavy Rain Hit Flights
- पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates
- मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुण्यात पवासाचा कहर, घरांमध्ये शिरलं पाणी - Maharashtra Rain Updates