मुंबई Maharashtra Rain Updates : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तीन जिल्हे आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसंच रत्नागिरी, रायगड, सातारा, विदर्भातील, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आलाय.
गडचिरोलीत पावसामुळं अनेक मार्ग बंद : गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस असून त्यामुळं अनेक मार्ग बंद झालेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तर गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसल्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळून वाहणारी इंद्रावती पर्लकोट पामुलगौतम नदी दुथडी भरुन वाहत आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्यानं आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झालाय. तसंच यामुळं भामरागड तालुक्यातील गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तर खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनानं नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत.
20 Jul, 📌Heavy rainfall district level alerts📢 by IMD for #Maharashtra next 4,5 days.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 20, 2024
Pl see https://t.co/9fSzXCfiA4 for more details. @SDMAMaharashtra @CMOMaharashtra @RMC_Mumbai @imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/maG7xmkfVd
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ : कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ही कमालीची वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी चार फुटांनी वाढलीय. पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या 36 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात संततधार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीवरील 77 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरण 72 टक्के भरलं असून धरणातून सध्या 1450 तर वारणा धरणातून 1396 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच जलसंधारण विभागाकडील शाहूवाडी तालुक्यातील लघु पाटबंधारे भंडारवाडी, बुरमबाळ, इजोली, बर्की, वाकोली, येळवण जुगाई, आयरेवाडी, गावडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरले आहेत.
हेही वाचा -
- मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका, मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन - Maharashtra Rain Update
- मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाचं थैमान; रस्ते जलमय, लोकल सेवाही ठप्प - Mumbai Rain Update
- सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलं, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा - Heavy rain in Satara