सातारा Maharashtra Rain Updates : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून दमदार पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. सोमवारी (15 जुलै) सकाळी धरणातील पाणीसाठा 40 टीएमसी झाला.
24 तासात विक्रमी पावसाची नोंद : कोयना धरण क्षेत्रात मागील 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झालीय. कोयनानगरला 187 मिलीमीटर, महाबळेश्र्वरमध्ये 99 मिलीमीटर तर नवजा येथे सर्वाधिक 274 मिलीमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळं धरणात प्रतिसेकंद 48 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळं 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 4.50 टीएमसीनं वाढ झालीय.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, ओढ्यांना पूर : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कृष्णा, कोयनासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीय. तसंच महाबळेश्वर तालुक्यातील ओढे आणि नाल्यांना पूर आलाय. संततधार पावसामुळं घाटमार्गावर दरडीदेखील कोसळत आहेत. त्यामुळं आता याठिकाणची परिस्थिती बिकट असल्याचं सांगितलं जात आहे.
सातारा जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा : हवामान विभागानं रविवारी सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. तर सोमवारी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं मंत्रालय नियंत्रण कक्षानं नागरिकांना सावधानता बाळगण्याचं सुचित केलंय. संततधार पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास नद्यांचं पाणी इशारा पातळीवर जाऊ शकतं.
महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता : भारतीय हवामान खात्यानं आज (15 जुलै) मराठवाडा तसंच विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा दिलाय. बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, अकोला, गोंदिया, चंद्रपूर तसंच नागपुरात पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरालादेखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत आज दुपारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
हेही वाचा -