मुंबई Sanjay Raut : 'महाराष्ट्रात ही योजना बंद करू, ती योजना बंद करू' हे सूडाचं राजकारण सुरू आहे. ते फडणवीस यांनी सुरू केलय. त्यांना भीती का वाटते की, त्यांचं राज्य जाईल. म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत. पण देवेंद्र फडणवीस जे पडद्यामागून कपटकारस्थान करत आहेत. महाराष्ट्र ते उघड्या डोळ्यानं पाहात आहे, असं वक्तव्य करत संजय राऊतांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागलं.
फडणवीस यांचं पडद्यामागून कपटकारस्थान : देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व घाशीराम कोतवाल आहेत. आज तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. घाशीराम कोतवाल यांचा इतिहास काय आहे, हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगू. महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्राला शिवसेनेनं 3 मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. हे त्यांना माहीत नसेल. तर तुम्ही या महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं, अशी टीका त्यांनी केली.
गाशा गुंडाळायला सुरुवात करावी : चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नावं बदलून काँग्रेसच्या योजना चालवलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या. वर्षानुवर्ष आणि गरिबाच्या, संरक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत या सगळ्या योजनांची त्यांनी फक्त नावं बदलली आणि त्या चालू ठेवल्या. योजना त्याच आहेत. याकरता फडणवीसांनी आता त्यांचा गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. कारण महाराष्ट्राची जनता आता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिलाय.
वन नेशन वन इलेक्शनच्या बाता : नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढं करून सांगतात, वन नेशन वन इलेक्शन. पण ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहे. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवत आहेत. कारण महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे. यासाठी तुम्हाला जास्त वेळ हवा असल्याने तुम्ही या दोन राज्यात निवडणुका घ्यायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
लाडकी बहीण योजना टर्निंग पॉईंट : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी टर्निंग पॉईंट ठरेल असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, अजिबात नाही. कदाचित तो यूटर्न ठरेल. हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट आहे, असं काही नाही. अशा प्रकारच्या खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्या आहेत. त्यानी काय फार मोठी क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत. सरकार दीड हजार रुपये काही खिशातले देत नाही. लोकांच्या कराचे पैसे आहेत ते. आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही ३ हजार रुपये देऊ हा आमचा शब्द असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा