मुंबई Prakash Shendge : सध्या राज्यात राजकीय, सामाजिक क्रांतीची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वतःचा पक्ष असायला पाहिजे, असं सांगत ओबीसी समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज (14 फेब्रुवारी) मुंबईत 'ओबीसी बहुजन पार्टी'ची स्थापना केली. या पक्षाच्या वतीनं ४८ लोकसभा मतदारसंघामध्ये लढत देणार असल्याचंही शेंडगे यांनी स्पष्ट केलं.
'या' उद्देशासाठी पक्षाची स्थापना: "सध्याच्या परिस्थितीत राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय शोषित, पीडित, वंचित, दलित वर्गाचं कल्याण होणार नाही. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांची सत्तेची मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. स्वतः राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. म्हणूनच 'आपलीच मते, आपलाच पक्ष, आपलाच नेता आणि आपलीच सत्ता' आणायला हवी. त्यासाठी देशातील आणि राज्यातील ओबीसी वर्गाला राजकीयदृष्ट्या संघटित करण्याची गरज आहे", असं सांगत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी बुधवारी 'ओबीसी बहुजन पार्टी'ची स्थापना केली. आगामी निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राजकीय आणि सामाजिक क्रांती करणार: आता राजकीय आणि सामाजिक क्रांती घडविण्यासाठी हा पक्ष कार्यरत राहणार आहे. इतर पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पार्टीत सहभागी व्हावं असं आवाहनदेखील शेंडगे यांनी केलं. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि एका विशिष्ट समाजाला झुकतं माप देण्याची सरकारची प्रवृत्ती चुकीची आहे. ७५-८० टक्के लोकसंख्येच्या मागासलेल्या वर्गाला सत्तेपासून दूर ठेवून केवळ स्वार्थासाठी त्यांच्या मतांचा वापर केला जात आहे. त्यामुळे वंचित वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिला असल्याचा आरोप त्यांनी केला.
'हे' असणार पक्षाचं चिन्ह: "तुतारी वाजविणारा पुरुष हे चिन्ह प्राथमिक स्तरावर पक्षाला मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यवतमाळ, नांदेड, हिंगोली, माढा, बीड, सांगली इतर मतदार संघातील उमेदवार ठरले आहेत. आमची लढाई कोणत्याही रंगाशी, झेंड्याशी नसून माणुसकीची लढाई आहे," असं प्रकाश शेंडगे म्हणाले. "अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं वादळ महाराष्ट्रात घोंगावत होते. त्यांच्या दबावाला बळी पडून ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचं काम सरकारनं केलं. त्यामुळे भयभीत झालेल्या ओबीसी समाजाला पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता, असा त्यांनी दावा केला.
हेही वाचा:
- सोनिया गांधी राज्यसभेत! उमेदवारी अर्ज केला दाखल; लोकसभेला प्रियंका गांधी मैदानात?
- BAPS हिंदू मंदिर : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेले युएईमधील मंदिर कसे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर, शेतकरी आंदोलनावरुन सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मोदींना कशाला प्राधान्य द्यावं ते कळत नाही