मुंबई Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदी नुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाहीत. त्यामुळं त्यांना मतदान करायला देऊ नये, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीतून विधानभवनात दाखल झाले आहेत. गणपत गायकवाड हे मतदानाचा हक्क बजावणार का, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क देण्याबाबत राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचे प्रतिनिधी अभिजीत वंजारी यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, "विधानसभा सदस्य गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचं समजतं. त्यांना मतदान करण्यापासून रोखावं. गणपत गायकवाड यांना मतदान करू दिल्यास कायदेशीर बाबींचा अवलंब करावा लागेल," असा इशाराही अभिजीत वंजारी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलाय.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं होत. त्यावेळीदेखील निवडणुक होती. त्यावेळी मी परवानगी मागितल्यानंतर न्यायालयानं परवानगी दिली नव्हती. भाजपानं मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांच्यासाठी परवानगी मागवून घेतली आहे. - अनिल देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार
भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग भाजप केला जात आहे. न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. पण एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांना मतदानाला येऊ दिले नव्हते. निवडणूक आयोग बोगस आहे. निवडणूक आयोग भाजपाचा गडी आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडं हरकत घेतली आहे. - अंबादास दानवे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
मला काँग्रेस पक्षाची आणि नेत्यांची कीव येतं आहे. तसेच खासदार संजय राऊत ज्याप्रकारे बोलले त्यांची देखील कीव येतं आहे. यापूर्वी देखील बऱ्याच विधानपरिषद निवडणूका राज्यात झाल्या आहे. तुरुंगात असलेल्या व्यक्तींनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. तुरुंगात असलेले आणि आरोप असलेल्या बहुतेक लोकांनी मतदान केले आहे हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार असून ते शंभर टक्के मतदान करतील, असं भाजप आमदार संजय कुटे यांनी म्हटले आहे. तुरुंगातून अनेकांनी निवडणुका देखील लढवल्या आहेत. पंजाब मधील सतपाल सिंग तुंरूगात राहून निवडणूक लढवून जिंकून आले. विरोधकांना कोणताही मुद्दा नसल्यामुळे खोटे नरेटिव्ह तयार करायचा आणि दिवसभर चालवायचा असा हा प्रकार असल्याचं आरोप यांनी विरोधकांवर केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. "जर का आमची मतं फुटत असतील तर विरोधकांचीही मत फुटतील", असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं.
यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात- भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी देऊ नये, असं पत्र काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं आहे. गणपत गायकवाड आज तळोजा जेलमधून येऊन विधान भवनात मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की," गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात. परंतु अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानासाठी येऊ दिलं नाही. यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात."
हेही वाचा-