नाशिक Nashik News : "नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खूप वाव आहे. शहराचा विस्तार होत असताना योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष द्यावं लागणार आहे. त्यादृष्टीनं स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे," असं मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय. शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
काय म्हणाले राज्यपाल? : यावेळी बोलताना, "जिल्ह्याच्या अविकसित भागांच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीनं क्षेत्र निश्चित केल्यावर शासन स्तरावरुन सहकार्य मिळवणं सोयीचं होईल. कृषी आणि पशुधनाच्या विकासावरही विशेष लक्ष देऊन ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासालाही चालना देण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे," असं राज्यपाल राधाकृष्णन म्हणालेत. तसंच "औद्योगिकदृष्टीनं विकसित होणाऱ्या नाशिकसारख्या शहरात तंत्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधांनी युक्त संस्था असणं गरजेचं आहे. आयआयएम, आयआयटी दर्जाच्या सुविधा असणाऱ्या तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्था येथे गरजेच्या आहेत. शासनस्तरावरही याबाबतचा विचार करण्यात येईल," असंही त्यांनी सांगितलं.
कांदा प्रक्रिया उद्योगाबाबत प्रयोग व्हावे : राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनांच्या जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत राज्यपाल राधाकृष्णन यांनी सविस्तर माहिती घेतली. महसूल दस्तावेजचे डिजिटायझेशन, राज्यात सेवा हक्क कायद्याची चांगल्यारितीनं अंमलबजावणी होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. नागरिकांच्या हक्कांची योग्यरितीनं जपणूक व्हावी. बचतगटांना आदिवासी भागात पोषण आहार पुरवठा करण्याबाबत नियोजन करावं. वायनरीच्या गरजेनुसार द्राक्ष पिकाबाबत संशोधनाला चालना देण्यात यावी, कांदा प्रक्रिया उद्योगाबाबतही प्रयोग व्हावेत. त्यासाठी बाजाराची मागणी आणि पुरवठा साखळीचा अभ्यास व्हावा. शासन प्रक्रिया उद्योगांना सहकार्य करत असल्यानं अशा उद्योगांना चालना देता येईल. यादृष्टीनं प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. तसंच कृषी विकासाच्या बाबतीत विशेषतः द्राक्ष आणि कांदा पिकाच्या बाबतीत अधिक संशोधन होण्याच्या दृष्टीनं कृषी विद्यापीठांशी सहकार्य करून त्याला गती द्यावी, जल जीवन मिशन, पीएम किसान, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी घेतली. नाशिक शहरानं स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन करावं, अशी सूचनाही राज्यपाल यांनी यावेळी केल्या.