मुंबई : पूर्वीप्रमाणे उद्योगात महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी राज्याच्या विकासासाठी काम करणारे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे वरिष्ठ निरीक्षक, तसेच राज्यसभा खासदार डॉ. सय्यद नासीर हुसेन यांनी केलंय. खासदार डॉ. सय्यद नासीर हुसेन यांनी आज पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील जनता ऐतिहासिक विजयासाठी सज्ज: भाजपाने निवडणुकीची वेगळी संस्कृती प्रचलित केलीय. समाजात तेढ निर्माण करण्याबरोबरच धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न भाजपातर्फे नेहमी केले जातात. त्यामध्ये यश आले नाही तर पैसे देऊन ईडी, सीबीआयद्वारे धमकावून आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश मिळाले नाही तर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर पक्ष फोडण्याचे काम भाजपा करते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे हे सर्व प्रकार करण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर करून आमदारांना धमकावून राज्यातील सत्ता त्यांनी हस्तगत केली, त्याचा बदला घेण्यास महाराष्ट्रातील नागरिक सज्ज झालेत, असेही ते म्हणाले. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडून मुंबईत आणण्यात आले होते. त्याचा बदला कर्नाटकातील जनतेने घेतला. राज्यातील जनता महायुती सरकारला हटवण्यासाठी आणि ऐतिहासिक विजयासाठी सज्ज झालीय, असा दावा त्यांनी केलाय.
महाराष्ट्र सरकार गुजरातसाठी काम करतंय: महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी काम करीत आहे. राज्यातील कामांची कंत्राटे गुजराती कंपन्यांनी दिली जाताहेत. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अंमली पदार्थ कुठे जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर ते महाराष्ट्रात आणले जात असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. गुजरात धार्जिण्या सरकारला मते द्यायची की महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या सरकारसाठी मते द्यायची, याचा निर्णय जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केलंय.
सरकारचा मोठा भ्रष्टाचार: राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनी विविध कामांच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार केलाय. दिल्लीतील भाजपा नगरसेवकाच्या कंपनीला राज्यातील पीएमएवाय योजनेचे कंत्राट देण्यात आले, त्यासाठी सव्वाशे कोटी रुपये देण्यात आले. मात्र अद्याप एकही घर तयार झालेले नाही. राज्यात अनेक विकासक असताना दिल्लीतील भाजपाशी संबंधित विकसकाला हे कंत्राट देण्याचे काय कारण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
प्रत्येक कामात 35 ते 40 टक्के भ्रष्टाचार : सरकारने सर्व कामांमध्ये 35 ते 40 टक्के भ्रष्टाचार केलाय, असा आरोप त्यांनी केलाय. मुंबईची पूर्वीची ओळख मिळवून देणे आमचे धेय्य आहे, त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणालेत.
हेही वाचा :