मुंबई Maharashtra assembly session : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. दरम्यान, काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन ठरणार आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन होत असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय. शिवाय, उद्या पावसाळी अधिवेशनात मी माध्यमांशी बोलताना राजकीय विषयावर माझी भूमिका मांडेन, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे यंदा पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं विरोधकांना चहापानाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, विरोधकांनी चहापान समारंभावर बहिष्कार टाकला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होत असलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघात महायुती तसंच माविआमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे. पत्रकार किरण शेलार यांना भाजपानं मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी मंत्री अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज : "विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील भाजपाविरोधी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही", असं उद्धव ठाकरे यांनी भाजपासह नरेंद्र मोदींना सुनावलं आहे.
गुजराती ईस्ट इंडिया कंपनीचा देशात इव्हेंट : "गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीनं देश चालविण्याच्या नावाखाली इव्हेंट केलाय. देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा, पण दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचं काम मोदी यांनीच केलं. देशात विरोधी पक्ष टिकूच द्यायचा नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तसंच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांना भाजपात आणायचं काम भाजपान सुरू केलं आहे. जे बोलतील त्यांना तुरुंगात टाकायचं काम सरु आहे. हेच मोदींचं धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचं होतं काय?", असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
'हे' वाचलंत का :
- लोकशाही वाचवण्यासाठी खोकेशाहीला अद्दल घडवा : किशोरी पेडणेकर; तर किरण शेलारांना जिंकण्याचा विश्वास - Graduate Constituency Election 2024
- राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल थलपती विजयनं केलं अभिनंदन - Vijay congratulated Rahul Gandhi
- युक्रेन शांतता परिषदेत युद्धबंदीची घोषणा, मात्र भारतानं एकाच दगडात मारले दोन 'पक्षी' - Ukraine Peace Summit