मुंबई: विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. तर 9 डिसेंबरला बहुमत चाचणी घेण्यात येणार आहेत. अधिवेशनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले, " 15 व्या विधानसभेचे नवनिर्वाचित 288 सदस्य 7 आणि 8 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. पुढे पवार म्हणाले, "अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळातील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहोत.
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहोत. राज्य सरकारनं 6 डिसेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये शुक्रवारी बंद राहणार आहेत. तसेच दारूची दुकाने बंद राहणार आहेत".
- मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 डिसेंबर किंवा 12 डिसेंबरला होऊ शकतो. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. हे अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देवेंद्र फडणवीस हे चहापाण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांना प्रथेप्रमाणं 15 डिसेंबरला निमंत्रित करणार आहेत.
महायुती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी घेणार निर्णय- महायुतीमधील सूत्राच्या माहितीनुसार अजित पवार यांना पूर्वीप्रमाणं अर्थ आणि नियोजन खाते मिळू शकते. अजित पवार हे अधिवेशनात पुरवण्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करू शकतात. कल्याणकारी योजना आणि विविध विकासकामांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी ते गरजेचं आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीचादेखील समावेश आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांचे पीककर्ज पूर्णपणे माफ करू शकते. तसेच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर करण्यासाठी रोडमॅप जाहीर करू शकते. महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या दहा आश्वसनांची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचं महायुतीमधील सूत्रांनी सांगितलं.
खातेवाटपासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी भाजपानं फेटाळली आहे. त्याबदल्यात भाजपानं नगरविकास खाते देण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे गटनेते पवार यांनी दिले.
हेही वाचा-