मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. विरोधकांचं आक्रमक स्वरुप पाहता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विविध विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
- महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन १२ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.
विरोधक विविध मुद्दे उपस्थित करत सभागृहात सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी शेवटचे अधिवेशन आहे. शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. शेवटच्या अर्थसंकल्पात सरकारकडून विविध घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने मतं मिळवण्यासाठी अर्थसंकल्पात जनहिताचे अनेक निर्णय होऊ शकतात, असेही बोललं जातं आहे.
हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता- विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून मुख्यत: शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे दर, कांदा निर्यात बंदी आणि कांद्याचे दर, शेतकऱ्यांची आत्महत्या, बोगस बी-बियाण्याचं वाढलेले प्रमाण यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, स्थानिकांचा विरोध असतानाही वाढवण बंदराचा विकास, राज्यातील अमली पदार्थ तस्करीचे वाढलेले प्रमाण, नीट परीक्षा रद्द झाल्यानं शैक्षणिक जगतात झालेला परिणाम हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. गेली काही दिवस राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलयं. त्याचे पडसादही सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. पुणे हिट अँड रन प्रकरण देशभरात गाजल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते असुरक्षितता आणि बेकायदेशीर पबची समस्या चव्हाट्यावर आली. त्यावरूनही विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. महिलांवरील वाढलेले अत्याचार, महिलांवर खुलेआम हल्ले, संसदेच्या आवारातील महापुरुषांचे पुतळे हटविणे आदी मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी- अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चहापाण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, चहापांनाच्या कार्यक्रमांवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच सरकारच्या कामावरून विरोधकांनी सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला. "राज्यातील विविध प्रश्नांवरुन आम्ही अधिवेशनात सरकारला घेरणार आहोत. हे सरकार राज्यातील अनेक प्रश्न सोडवण्यास अयशस्वी ठरले आहे," असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय दिल्या सूचना- शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. नीटमधील पेपरफुटी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सभागृहात मुद्दे उपस्थित करण्याच्या सूचना ठाकरे यांनी आमदारांना दिल्याचं सूत्रानं सांगितलं. तसेच राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणावरही प्रश्न उपस्थित करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "आमचे महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी, आमच्या भगिनींसाठी आणि महाराष्ट्रातील सात कोटी महिलांसाठी चांगले निर्णय घेणार आहे. हे सरकार आर्थिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बळ घटकांच्या गरजांना प्राधान्य देईल." भाजपा प्रदेशाध्यक्षांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले, " विरोधक कधीही विकासावर बोलत नाही. जातीवर राजकारण करून जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात."
हेही वाचा-