मुंबई Maharashtra Assembly elections : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपा पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतलीय. राज्यातील नेत्यांनी आता स्वबळाची भाषा करू नये, असा इशारा त्यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे. राज्यात महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवावी, अशा सूचनाही भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव तसंच अश्विनी वैष्णव यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसंच अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह 30 प्रमुख नेते उपस्थित होते.
वादग्रस्त वक्तव्य करू नये : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा पराभव भरुन काढण्यासाठी भाजपा केंद्रीय नेतृत्व सज्ज झालं आहे. राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश कोअर कमिटी ग्रुपला पोहचवलाय. यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की, "येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील. राज्याचे निवडणूक प्रभारी, देवेंद्र फडवणीस हेच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा करतील. तसंच केंद्रीय नेतृत्वाला याची माहिती देतील."
वादग्रस्त वक्तव्य टाळा : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतून बाहेर काढलं पाहिजे, अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य भाजपामधील कुठल्याही नेत्यानं करू नये," अशी तंबी भूपेंद्र यादव यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नयेत. याकडंही लक्ष द्या, असंही सांगितलं आहे.
14 जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक : "14 जुलै रोजी पुण्यात राज्याची विस्तृत कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील भाजपाचे साडेचार हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः या बैठकीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसंच भाजपाची ब्लू प्रिंट ते जनतेसमोर मांडणार आहेत," अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणूका आम्ही मित्र पक्षांसोबत एकत्र लढवू, असं भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
'हे' वाचलंत का :
- उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News
- "अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसं..." शरद पवारांचं निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य - SHARAD PAWAR News
- "अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसं..." शरद पवारांचं निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य - SHARAD PAWAR News