मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिला होता. मात्र त्यांना 240 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रात महायुतीने 40 प्लसचा नारा दिला होता. मात्र त्यांना एकूण 17 जागांवर विजय मिळवता आलाय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम आणि दलित बांधवांनी भरभरून मतं दिली. त्या मताच्या जोरावर महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं. आता मुस्लिम आणि दलित मतं ही महाविकास आघाडीला मिळू नये, यासाठी महायुतीकडून अनेक प्रयत्न केले जाताहेत. चक्क केंद्रीय पातळीवरील मंत्री आणि नेतेसुद्धा राज्याचे वारंवार दौरे करताहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी अनेक महाराष्ट्राचे दौरे केले आहेत. या दौऱ्यात खासकरून त्यांनी अनेक बुद्धविहार आणि मुस्लिम वस्तींना भेट देत महाविकास आघाडीनं मुख्यतः काँग्रेसने तुमच्यावर कसा अन्याय केलाय, असं सांगण्याचा प्रयत्न करताहेत. पण किरण रिजीजू दलित आणि मुस्लिम मतदारांचे मन परिवर्तन करून त्याचे रूपांतर मतदानात करू शकतील का? हाच खरा प्रश्न आहे. याची काय आहेत कारणे पाहू यात...
मविआला मतं देऊ नका... : केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे सातत्याने महाराष्ट्राचा दौरा करताना दिसत आहेत. लोकसभेनंतर चार ते पाच वेळा महाराष्ट्रात आले. इथे आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली, नागपूरला दीक्षाभूमीची भेट घेतली, पुणे, मुंबई या शहरातील नेत्यांच्या गाठीभेट घेतल्यात. या ठिकाणावरील बुद्ध विहारांना भेट दिली. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एका कुटुंबाने पिण्यासाठी पाणी देण्यास नाकारले होते. तिथे किरण रिजीजू यांनी भेट दिली होती. त्यावेळी दलित समाजावर अन्याय कसा झाला होता, असं सांगत दलित समाजाकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी आणि मुंबई आणि पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक बुद्धविहारांना भेट दिली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले होते. यादरम्यान, त्यांनी राज्यातील दलित नेते यांचीही भेट घेतली. किरण रिजीजू म्हणाले की, मागील वेळी जसे दलित आणि मुस्लिम बांधवांनी महाविकास आघाडीला मतदान केले होते. ती चूक यावेळी दलित आणि मुस्लिम बांधवांनी पुन्हा करू नये. मात्र किरण रिजीजू यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रातील मुस्लिम आणि दलित बांधवांचे मन परिवर्तन होऊन मतपरिवर्तन होईल का? यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
लोकसभेसारखं वातावरण नाही... : मुळात किरण रिजीजू हे संघाची जरी व्यक्ती असले तरी सत्तेसाठी दलबदलूदेखील आहेत. कारण काँग्रेसच्या काळात ते खासदार होते आणि जेव्हा भाजपाचे सरकार आले, तेव्हा ते आता सत्तेत केंद्रीय मंत्री आहेत. किरण रिजीजू हे जिकडे सत्ता असते तिकडे असतात, अशी टीका विरोधकांनी केलीय, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील मुस्लिम आणि दलित बांधवांनी मतदान भाजपाला किंबहुना महायुतीला करण्याचं आवाहन केलंय. त्यात ते थोडेफार यशस्वी होऊ शकतात. कारण जी लोकसभेत उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती किंवा मुस्लिम आणि दलित बांधवांनी जे मतदान लोकसभेत महाविकास आघाडीला केले होते. तसे वातावरण आता सध्या विधानसभा निवडणुकीत दिसत नाही. कारण विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित बांधवांना काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळं ते नाराज आहेत. तर महायुतीला लाडकी बहीण या योजनेचा फायदा थोडाफार होऊ शकतो. पण लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित बांधवांनी महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं होतं. तसे आता मतदान होण्याची शक्यता कमीच असल्याचं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय. मुस्लिम आणि दलित मतदारांमध्ये आता थोडेफार मतपरिवर्तन होऊ शकतं आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. तर मुस्लिम आणि दलित बांधवांच्या मतदारांचा थोडाफार फायदा महायुतीला मिळू शकतो, असंही जयंत माईणकर यांनी सांगितलंय.
दिल्लीतील नेत्यांनी राज्यात ठाण मांडलाय : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताहेत. त्यामुळं दोघात चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत जी महाराष्ट्रात महायुतीच्या बाबतीत घडले होते. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ द्यायची नाही, यासाठी दिल्लीतील केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आदी दिल्लीतील नेते हे महाराष्ट्रातील प्रचारात सहभागी होताना दिसताहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेनं जी चूक केली होती ती चूक आता करू नये. त्यामुळं मतदान आम्हालाच करा, अशी साद केंद्रीय पातळीवरील नेते मतदानांना घालताना दिसताहेत. महायुती गाफील न राहता अधिक सावध झाली असून, जे लोकसभेत घडले ते आता विधानसभेत घडू द्यायचे नाही. यासाठी राज्यासह केंद्रातील नेत्यांनीही कंबर कसल्याचं दिसून येतंय. महायुती सरकारने लाडकी बहीण तसेच अनेक लोक कल्याणकारी योजना आणून पाच वर्षांत अनेक चांगली कामं केलीत, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काढलेत. यात आवर्जून लाडक्या बहिणीचा उल्लेख करताना दिसताहेत. मात्र जरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीसाठी आणि मुख्यतः भाजपासाठी हे नेते प्रचारात उतरले असले तरी, त्याचा कितपत फायदा महायुतीला होणार हे 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे. दरम्यान, मुस्लीम आणि दलित मतदारांचं मतदान हे टर्निंग पॉईट ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात 12 ते 13 टक्क्यांच्या आसपास मुस्लिम मतदार असल्याचं मानलं जात. तर महाराष्ट्रात दलित समाजाची 10 ते 11 टक्के दलित मतदारांची टक्केवारी आहे.
मुस्लिम-दलित मतदारांची टक्केवारी | |
मतदार | टक्केवारी |
मुस्लिम | 12 ते 13 |
दलित | 10 ते 11 |
हेही वाचा -