मुंबई - निवडणूक प्रचारासाठी अवघे 4 ते 5 दिवस शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री जोगेश्वरी पूर्व येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या जोगेश्वरी पूर्व येथून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, मंगळवरी रात्री रवींद्र वायकर हे कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केलाय. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा राडा झालाय. दोन्हीकडून दगडफेक आणि काठ्या फेकण्यात आल्यात. यानंतर ठाकरे गटाची जोगेश्वरीत गुंडगिरी सुरू असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी करावी, अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केलीय. आज त्यांनी मुंबईतील मातोश्री क्लब हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
अनंत नर यांच्याविरोधात गुन्हा दाखल : मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. तसेच त्याने व्हिडीओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ शूटिंग थांबवा, अशी महिलांनी विनंती केली. मात्र महिलांनाही शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या महिलांचा ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विनयभंग केलाय. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोग आणि पोलिसांनी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी खासदार रवींद्र वायकर यांनी केलीय. दरम्यान, मंगळवारी झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व येथील उमेदवार अनंत नर आणि पदाधिकारी अमित पेडणेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
...अन्यथा जीभ छाटेन : पुढे बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, मी जोगेश्वरीत अनेकदा आमदार म्हणून निवडून आलोय. इथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केलाय. कुठेही गुंडगिरी किंवा अस्थिर वातावरण झालं नाही. परंतु याला आता ठाकरे गट गुंडगिरी करीत आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे. अनंत नर यांनी आपल्या कौटुंबिक सदस्यांचा छळ केलाय, त्यांना त्रास दिलाय. आम्ही जोगेश्वरीचं सोनं केलंय. मात्र आता ठाकरे गटातील या गुंडगिरीमुळे जोगेश्वरीत सुरक्षित वाटत नाही. यामुळे निवडणूक अशी लढवायची? हा आमच्या समोर प्रश्न आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे पदाधिकारी अमित पेडणेकर यांनी आम्हाला धमकी दिलीय. जर तुम्ही ठाकरे गटाच्या विरोधात बोलला तर आम्ही तुमची जीभ छाटू, अशी धमकी दिलीय. याचीही पोलिसांनी दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रवींद्र वायकर यांनी केलीय.
हेही वाचा -