मुंबई- अमेरिकेच्या सरकारी संस्थांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आरोप केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी यांना अटक करण्याची मागणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या त्याच मागणीला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दुजोरा दिलाय. उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढलंय. खरं तर ही केंद्रातील मोदी सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे, असंही नाना पटोले म्हणालेत. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी आज मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
गौतम अदानींनी देशाला लुटलंय : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीने गौतम अदानींनी देश-विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटलंय. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलंय, पण अमेरिकेच्या तपास यंत्रणाच्या तपासात अदानींनी मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानीला अटक का केली जात नाही? असा सवाल उपस्थित करत भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानीला जेलमध्ये टाकावे ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.
सर्वच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी : यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने आणि सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटताहेत. विमानतळ, बंदरे, ऊर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी सुरू असून, त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. अदानीला देश-विदेशातील कंत्राटे देण्यासाठी पंतप्रधान मोदीच मदत करीत असल्याचं उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटी रुपयांची मुंबईतील जमीन अदानींच्या घशात घातलेली आहे. मुंबईचे विमानतळही अदानींना दिलंय. यापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्कम पाठिंबा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधींनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून, अमेरिका जर गौतम अदानींच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते, तर भारत सरकार का कारवाई करू शकत नाही. भारत सरकारने कारवाई करून देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, असंही नाना पटोले म्हणालेत.
हेही वाचा-