पुणे- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी महायुतीने 230 जागा जिंकून विरोधी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. या निवडणुकीत 132 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. विशेष म्हणजे भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 13 जागांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्यात. त्यामुळे महायुतीचं सरकार येणार आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक वेगळाच संदेश दिलाय.
पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट अन् दोन राज्यमंत्रिपद मिळणार?: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी बहुमत मिळालं असून, महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावर आता जोरदार चर्चा सुरू झालीय. तसेच सुरुवातीच्या काळात भाजपा 10 आणि शिवसेना, राष्ट्रवादी अनुक्रमे 5-5 असा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतंय. मात्र असं असलं तरी पुणे जिल्ह्यात तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दिलीप वळसे पाटलांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता : महायुतीकडून उद्या किंवा परवा शपथविधी पार पडला जाऊ शकतो. ज्यात राज्याचं मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होणार असलं तरी पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील या तीन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहेत. पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ या चार वेळा आमदार झाल्या असून, त्यांना आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणेंना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
पुण्यात महायुतीचे 18 आमदार : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जात असताना या निवडणुकीत जिल्ह्यातून महायुतीचे 18 आमदार हे निवडून आलेत. तर महाविकास आघाडीचे 2 आणि एक अपक्ष आमदार हे निवडून आलं असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी जिल्ह्यातील आपलं गड कायम ठेवलंय. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आतापासूनच वर्तविली जात आहे.
हेही वाचा-