मुंबई : राज्य सरकार जनतेला योजनांसाठी निधी देऊन कोणतेही उपकार करत नाही. उलट सरकारने सत्तेवर येण्यासाठी आमदारांची खरेदी करण्यासाठी आमदारांना 50-50 कोटी रुपये दिलेत. त्यामुळे राज्यातील जनतेवर विविध कर लावून सरकार प्रति वर्ष प्रत्येक कुटुंबाकडून 90 हजारांची लूट करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी केलाय. ते मुंबईत टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विविध योजनांचा पूर्ण लाभ जनतेला देणार: सरकारने गाजावाजा करून विविध योजना जाहीर केल्यात, मात्र त्यासाठी लागणाऱ्या निधीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. राज्यातील खोके सरकारकडून जनतेची लूट केली जातेय. सरकारकडे आमदारांवर खर्च करण्यासाठी 50 कोटी आहेत, मात्र त्याचा भुर्दंड जनतेला पडत असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही घोषित केलेल्या विविध योजनांचा पूर्ण लाभ जनतेला देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मागील 10 वर्ष अन्यायकाळ सुरू असल्याचं टीकास्त्रही त्यांनी डागलंय. बटेंगे तो जेब कटेंगे, हटेंगे तो दाम घटेंगे, अशी घोषणा पवन खेरा यांनी केलीय. आपण विभाजित झालो तर जनतेचे खिसे कापले जातील, असा इशारा त्यांनी दिलाय. जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारला हटवले तरच महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील, असे खेरा म्हणालेत. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसच्या मीडिया विभागाचे सुरेंद्र राजपूत उपस्थित होते. लग्नात रुसलेल्या नातेवाईकांप्रमाणे देवेंद्र फडणवीस अमित शाहवर रुसून बसलेत, असा टोला त्यांनी लगावलाय.
भाजपाचा जाती-धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न: मोदी सरकार सत्तेत आल्यावर जिहाद शब्दाचा वापर वाढलाय. केंद्रात तुमचे सरकार 10 वर्षांपासून आहे, मात्र यापूर्वी जिहाद शब्द ऐकू येत नव्हता. बटेंगे तो कटेंगे हा विचार देशात चालणार नाही, असे ते म्हणालेत. जेव्हा आरएसएस भाजपासाठी काम करते, पाठिंबा देते ते चालते, मग विशिष्ट समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास विरोध का होतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. भाजपाचा जाती-धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलाय. प्रमोद महाजन यांच्या हत्येची चौकशी व्हावी, या मागणीला त्यांनी दुजोरा दिला. आम्हाला अब्दुलची भीती दाखवतात आणि त्यांचे पुत्र दुबईमध्ये शेख सोबत बसतात, असा टोलाही त्यांनी अमित शाहांना लगावलाय. देवाच्या फोटोवर काँग्रेस उमेदवाराचे जाणीवपूर्वक फोटो लावण्याच्या प्रकाराविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली. प्रचंड महागाईचा जनतेला फटका बसत आहे. लसूण, कांदा यांचे दर गगनाला भिडलेत. एकीकडे शेतकऱ्यांना कमी दर मिळतो आणि दुसरीकडे दलालांना त्याचा लाभ मिळतो ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकार पाडण्याच्या चर्चेत अदानीची भूमिका काय होती, याचे स्पष्टीकरण मिळणे गरजेचे असल्याची भूमिका खेरा यांंनी मांडली. भाजपाने गुजरातमध्ये पाटीदार विरुद्ध पटेल, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे इतर राज्यांत जाती-जातींमध्ये भांडणे लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका सभेसाठी 8 कोटी खर्च होतात, भाजपाकडे पैसे कसे येतात, असा प्रश्न उपस्थित करून भाजपाने महाराष्ट्राला लुटून पैसे कमावलेत, असा आरोप खेरा यांनी केलाय.
मोदींनी सभा घेतल्यास आमचा लाभ - लोंढे : बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा करून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलीय. वणी येथे भाजपा पदाधिकाऱ्याने ओबीसींना अपशब्द वापरलेत. भाजपाची बहुजन आणि ओबीसींकडे पाहण्याची नीच मानसिकता यामुळे पुन्हा समोर आलीय. वणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मराठा, बहुजनांकडे तुच्छपणे पाहण्याची भाजपाची भूमिका राहिलीय. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत 19 सभा घेतल्या होत्या. मात्र त्यापैकी 17 जागांवर त्यांचा पराभव झाला. नरेंद्र मोदी आमचे ब्रँड अँबेसेडर आहेत, त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्यामुळे आम्हाला लाभ मिळेल, असा टोला लोंढे यांनी लगावला.
हेही वाचा :