पालघर Mahashivratri : जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वैतरणा नदीच्या मध्यभागी तीळसे येथे पांडवकालीन असलेले स्वयंभू महादेव मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी केलीय. महाशिवरात्रीनिमित्त सुमारे दोन ते तीन लाख भाविक राज्यभरातून दर्शनासाठी तीळसेत दाखल झाले आहेत. श्रीक्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर प्रशासनानं भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत.
पांडवांनी केली मंदीराची उभारणी : त्र्यंबकेश्वरवरून जशी गोदावरी नदी उगम पावते, तशीच वैतरणाही नदीही उगम पावते. दक्षिणेकडे वैतरणेचा प्रवाह सुरू होतो. वैतरणा नदीकाठी पांडव वनवासाच्या काळात वास्तव्य असल्याचा दावा या भागातील नागरिक करतात. वाडा तालुक्यात तिळसे येथे असलेल्या श्रीक्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिराची उभारणी पांडवांनी एका रात्रीत केली, अशी आख्यायिका आहे.
महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम : या मंदिरात दर्शनासाठी केवळ पालघर जिल्ह्यातूनच नाही, तर राज्यातील विविध भागातून भाविक येतात. विशेषतः पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील भाविकांची संख्या जास्त असते. महाशिवरात्रीनिमित्तानं येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या २७ वर्षापासून येथे अखंड हरिनामाची परंपरा सुरू आहे. श्री क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिरावर सौर ऊर्जा विभागानं आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
- पांडवरथाच्या खुणा : तिळसे येथील नंदिकेश्वर महादेव मंदिरापासून वैतरणेतून पांडवांचा रथ त्र्यंबकेश्वरकडे गेल्याच्या खुणा आहेत. या खुणा स्थानिक नागरिक लक्षात आणून देतात. पांडवांच्या या भागातील वास्तव्याचा पांडव रथाच्या खुणा हा पुरावा आहे, असं गावकऱ्यांचं म्हणणे आहे.
पुरातही मासे गाभाऱ्यात : पुरातन असलेल्या या महादेव मंदिर परिसरात तीन प्रकारचे मासे आढळतात. त्यात देवमासा, नथनी, तुकडी माशांचा समावेश होतो. हे मासे पाहण्याची भाविकांना उत्सुकता लागली आहे. दरवर्षी ठराविक लोकांनाच महाशिवरात्रीच्या दिवशी या माशांचं दर्शन होतं. वैतरणा नदीला कितीही पूर आला, तरी हे मासे पुराबरोबर वाहून जात नाहीत, तर मंदिराच्या गाभाऱ्यात राहतात, असं येथील स्थानिक नागरिक सांगतात. या मंदिराच्या पूर्वेला रस्त्याच्या दुतर्फा दर पाच फुटावर शिवकालीन पिंडी आहेत.
देवस्थान भाविकांसाठी सज्ज : यापूर्वी या मंदिराचा दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या परिसरातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन स्थानिक विश्वस्त मंडळांनी भाविकांच्या फराळाची तसंच अन्य व्यवस्था केली आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.
हे वाचलंत का :