कोल्हापूर Dhananjaya Mahadik : गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं आपली निर्णायक ताकद दाखवून दिलीय. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची मतं विचारात घ्यावची लागणार आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून याचा फटका महायुतीसह महाविकास आघाडीलाही बसणार असल्याचं मत भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचंही महाडिक यावेळी म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरात एक जागा भाजपाला हवी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, अशी भावना व्यक्त केली होती. 'हातकणंगले तसंच कोल्हापूर लोकसभेबाबत अद्याप कोणतीही माहिती भाजपाकडून देण्यात आली नाही. सोलापुरात दोनवेळा भाजपा खासदार निवडून आले, सातारामध्ये उदयनराजे निवडून आले, सांगलीत संजय काका पाटील दोनवेळा निवडून आले होते. यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचा खासदार करायचा असेल तर एक जागा पक्षाकडं असायला हवी. त्यामुळंच हातकणंगलेमधून शौमिका महाडिक यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यासाठी तयार असल्याचं खासदार महाडिक म्हणाले.
राहुल गांधी जिथं जाणार तिथं काँग्रेस फुटणार : 'काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. मात्र ज्या राज्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली, त्या राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं महाडिक म्हणाले. केंद्रात दहा वर्षापासून मोदी सरकार सत्तेत आहे. मात्र, भाजपाच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा अनेक मोठे घोटाळे उघडकीस आल्याचं' महाडिक यावेळी म्हणाले. 'भाजपाकडून अबकी बार 400 पारचा नारा दिला जात आहे. देशाची घटना बदलणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्मासमोर विरोधक फिके पडत आहेत. मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कार्यवाही सुरू असून जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करू नये', असं अवाहन महाडिक यांनी केलंय.
हे वाचलंत का :
- नितीन गडकरींनी नागपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज, 5 लाखांनी विजयी होण्याचा गडकरींना विश्वास - Nitin Gadkari filed nomination
- शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लढवणार लोकसभेच्या 22 जागा, जागावाटपात सांगलीचं मैदानही मोकळं - Shiv Sena Uddhav Thackeray
- प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil