मुंबई - काँग्रेसनं राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यात विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवली आणि सत्ता आल्यावर लोकांची फसवणूक केली. योजनांसाठी पैसे नसल्याचं सांगून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हात वर केले. मात्र आम्ही शब्द पाळणारे आहोत. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आम्ही अगोदरच दिला. आम्ही हप्ते भरणारे आहोत, मात्र महाविकास आघाडीचं सरकार हप्ते वसूल करणारं वसुली सरकार होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो - आम्ही निव्वळ फेसबुक लाईव्ह करत बसत नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. त्यामुळे आम्ही लोककल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मतदानानंतर दिला जाईल असं ते म्हणाले. आम्ही महिलांना लाडकी बहीणचे पैसे दिल्यानं विरोधकांचं तोंड बंद झालं आहे. मात्र विरोधक सत्तेवर आल्यास या योजना बंद करणार असल्याचं सांगत आहेत तसंच योजना सुरू करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवत आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेलं होतं, याचा जाब विरोधकांना जनतेनं विचारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लाडकी बहीण योजना सुरू करणे गुन्हा असेल तर असे हजार गुन्हे करण्यास आपण तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेचा हप्ता वाढवण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईची लूट केली - पंचवीस वर्षे मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी जनतेला लुटायचं काम केलं. रस्ते दुरुस्तीमध्ये साडेतीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आमच्या सरकारनं मात्र जनतेला देण्याचं काम केलं. मुंबईतील रस्ते आम्ही काँक्रीटचे केले. प्रदूषण कमी करण्यासाठी डीप क्लीनिंग केलं. मात्र पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये व रस्ते बांधणीमध्ये डांबराचे पैसे देखील खाल्ले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. सरकारनं स्वतःचे खिसे भरण्याऐवजी जनतेला सुखी समाधानी करण्याची गरज आहे, यावर आपला भर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण सामान्य नागरिकांमधील एक असल्याचं समजून काम करतो, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून अवघ्या दोन वर्षात गरजू रुग्णांना ३५० कोटींची मदत केल्याची, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील विमा कवच ५ लाखांपर्यंत वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. लाडका भाऊ योजनेत वर्षभरात १० लाख युवकांना लाभ देण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला. शेतकरी ज्येष्ठ नागरिक आणि इतरांसाठी केलेली कामं त्यांनी सांगितली. केवळ दोन वर्षांत इतकं काम केले आहे तर पाच वर्ष संधी मिळाली तर किती काम करू शकतो, याचा जनतेनं विचार करावा असं मुख्यमंत्री म्हणाले. मंगेश कुडाळकर आणि मुरजी पटेल यांना हरवणे अवघडच नाही तर अशक्य आहे असे सांगत शिंदे यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केले.
हेही वाचा..