अमरावती- अमरावती शहरात एका तरुणीनं 22 वर्षीय तरुणीची हत्या केली. हा गुन्हा मंगळवारी सायंकाळी छत्री तलाव परिसरालगत असणाऱ्या नवीन महामार्गावर घडला. तरुणीच्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली. शुभांगी काळे (22 )असं मृत तरुणीचं नाव आहे. ती वर्धा जिल्ह्यातील आर्वीची रहिवासी आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.
असा आहे घटनाक्रम- मृतक शुभांगी काळे ही तरुणी तीन दिवसांपूर्वी आर्वी येथून अमरावतीला आली. तिच्यासोबत आणखी एक मैत्रीण आल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शुभांगी नवीन बायपासवर छत्रीतलावालगत एका तरुणाला भेटायला गेली होती. या तरुणावर शुभांगीचं प्रेम होतं. दरम्यान त्या तरुणाचं दुसऱ्याच तरुणीवर प्रेम होतं. त्या तरुणीला दुसऱ्या तरुणीचं तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. दुसरी तरुणी आपल्या मित्रासोबत का बोलते? त्याला भेटायला का आली? असा राग दुसऱ्या तरुणीच्या मनात होता. तरुणानं ज्या ठिकाणी शुभांगीला भेटायला बोलावलं, त्या ठिकाणी ती तरुणीदेखील पोहोचली. यावेळी तिघांमध्ये वाद झाला. यानंतर त्या तरुणीनं शुभांगीवर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. या हल्ल्यात शुभांगी गंभीर जखमी झाली.
- तिच्यावर हल्ला करणारी तरुणी घटनास्थळावरून पळून गेली. यानंतर जखमी अवस्थेत असणाऱ्या शुभांगीला तिच्या मित्रांनी महामार्गावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाच्या मदतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच शुभांगीचे नातेवाईक आर्वी येथून रात्री अमरावतीला पोहोचले.
आरोपी तरुणीला अटक- या हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या तरुणीला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगीच्या हत्येच्या कारणासंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोपी तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला. हे संपूर्ण प्रकरण प्रेमाच्या त्रिकोणातून घडलं असावं, असा पोलिसांना अंदाज आहे. अमरावती शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. गुन्ह्याचं वाढते प्रमाण रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
हेही वाचा-