नागपूर : हजारो किलोमीटरच्या विस्तीर्ण सीमेवर रात्रंदिवस भारतीय जवानांचा कडक पहारा असतानाही शत्रू देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतीय शूर जवानांच्या शौर्य तसंच दक्षतेमुळं आज देश सुरक्षित आहे. हजारो किलोमीटर लांबीच्या सीमारेषेचे रक्षण करताना लॉरोस (Long Range Reconnaissance and Observation System) नावाचा सीसीटीव्ही कॅमेरा भारतीय जवानांना मदत करत आहे. लॉरोस हा एक वैशिष्ठ्यपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा आहे, जो शत्रूंच्या सूक्ष्म हालचालींवर नजर ठेवतो. त्यामुळं शत्रूची अचूक हालचाल भारतीय जवानांना मिळण्यास मदत होते. ऑब्झर्व्हेशन सिस्टीम लॉरोस कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्याची रेंज किती किलोमीटपर्यंत आहे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
लॉरोस सीसीटीव्ही कॅमेरा पाहण्यासाठी गर्दी : भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी नागपुरातील मानकापूर स्टेडियम परिसरात भारतीय सैन्याच्या विविध उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात लॉरोस सीसीटीव्ही कॅमेराही ठेवण्यात आला आहे. त्यामुळं हा कॅमेरा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.
कॅमेराद्वारे देशाच्या सीमेवर लक्ष : भारताच्या सीमा पाकिस्तान, चीन, म्यानमार, बांग्लादेशाला लागून आहेत. त्यामुळं देशाच्या सीमांची सुरक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे. शेजारील देशांकडून वारंवार होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तसंच भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (ITBP) जवान सीमेवर तैनात असतात. सैन्याचे जवान पहारा देऊ शकत नाहीत, अशा प्रत्येक ठिकाणी लॉरोस सर्व्हिलन्स सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येते.
शत्रूच्या ठिकाणावर निशाना : लॉरोस कॅमेरा केवळ शत्रूंवर लक्ष ठेवत नाही, तर गोळीबाराच्या वेळी शत्रूंच्या स्थितीवरही लक्ष ठेवतो. त्यामुळं शत्रूचं अचूक ठिकाण जवानांना मिळण्यास मदत होते. तसंच लॉरोस कॅमेराद्वारे शत्रूच्या ठिकाणावर गोळीबार करण्यासाठी मदत होते. गोळीबार कुठं कारावा, याची विश्वसनीय माहिती देखील यातून मिळते. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेंज सुमारे 20 किलोमीटरपर्यंत आहे. एवढंच नाही तर, हा कॅमेरा दिवसा तसंच रात्री देखील उत्तम काम करतो. त्यामुळं सैन्याला 20 किमीपर्यंत अचूक शत्रूच्या ठिकाणावर निशाना साधता येतो. तसंच या कॅमेराद्वारे 40 किमी अंतरावरावरील वाहनांची माहिती माहिती मिळते.
लॉरोस सर्व्हीलन्स सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती : लॉरोस सर्व्हीलन्स सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या युनिटमध्ये तीन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. इस्रायल देशानं या कॅमेऱ्याची निर्मिती केली आहे. लाँग रेंज रिकॉनिसन्स अँड ऑब्झर्व्हेशन सिस्टीम (LORROS) असं या कॅमेऱ्याचं नाव आहे. जवळच्या तसंच मध्यम श्रेणीच्या निरिक्षणासाठी हे उपकरण सैन्यात समाविष्ट केलं आहे. या कॅमेऱ्याला तीन फील्ड ऑफ व्ह्यू आहेत.
हे वचालंत का :