कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असताना श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेतली. बंद दाराआड दोघांमध्ये झालेल्या या चर्चेत कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीवर खलबते झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता श्रीमंत शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून ऑफर येण्याची शक्यता आहे. तसे संकेत महाराजांकडूनच मिळाले आहेत.
महाविकास आघाडीचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांनी कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत शाहू महाराज उमेदवार असतील तर आपल्याला आनंद होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात श्रीमंत शाहू महाराजांना उतरवलं जावू शकते अशी जोरदार चर्चा आहे. या राजकीय चर्चेनंतर आज एका कार्यक्रमानिमित्तानं कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत शाहू महाराज आले होते. माध्यमांनी त्यांना लोकसभेच्या उमेदवारीवरून विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले," महाविकास आघाडीचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाही. हा फॉर्म्युला ठरण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. तसंच, मला अजून ऑफर आलेली नाही. मात्र, ऑफर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपण सगळे मिळून वाटचाल करूयात, असं वक्तव्य करून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याचे थेट संकेत महाराजांनी दिले आहेत.
तुतारी कायमच वाजत असते : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना भारतीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला कोणतं चिन्ह मिळणार याबाबत उत्सुकता होती. आता निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं आहे. यावर बोलताना श्रीमंत शाहू महाराजांनी "तुतारी कायमच सगळीकडं कोणत्याही कार्यक्रमात आणि चांगल्या वेळी वाजत असते," अशी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीकडून पुरोगामी चेहऱ्याला प्राधान्य : केंद्रात मोदी सरकार तर राज्यात महायुतीचं भाजप प्रणित सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवारांनी सध्या भाजपाला जोरदार लक्ष केलं आहे. ज्या कोल्हापुरनं देशाला पुरोगामी विचारांचा वारसा दिला, त्याच कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीत पुरोगामी चेहरा म्हणून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभेला उमेदवारी देऊ शकते अशी परिस्थिती आहे. तसे संकेत शरद पवारांच्या दौऱ्यात आणि शाहू महाराजांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
हेही वाचा :