शिर्डी (अहमदनगर) Political Leaders Sai Baba Darshan : भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर साई मंदिरात येवून साई समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर लगेच भाजपा नेत्या आणि बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आपल्या आईसमवेत साई मंदिरात पोहचल्या. यावेळी नितेश राणे यांच्याशी मुंडे यांची भेट होताच एकमेकांची आणि कुटुंबातील व्यक्तीची दोघांनीही आस्थेनं विचारपुस केली.
मुंडे, राणे, बारणे शिर्डीत : निवडणूक प्रचारामुळं मुलाला आणि पत्नीला वेळ देवू शकलो नव्हतो. त्यामुळं त्यांची नाराजी होती. ती आता या निम्मितानं दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दर्शनानंतर दिली. तर मी आईची अष्टविनायक आणि देवदर्शनाची इच्छा पूर्ण करत असून, साईंचा आशिर्वाद आमच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. दरम्यान, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनीही शिर्डीत येवून साई दर्शन घेतलं.
शिर्डीत नेत्यांची रीघ : लोकसभा निवडणुकीसाठी मागील जवळपास दोन महिने प्रचार सुरू होता. त्यानंतर तब्बल एक महिना मुख्य निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळं देशासह राज्यातील सर्वज नेते व्यस्त होते. आता राज्यातील प्रचार आणि निवडणुका दोन्ही संपलं आहे. त्यामुळं नेतेमंडळी आता कुठे थोडेफार कुटुंबियांना वेळ देत असल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच नेते देवदर्शनसुद्धा करत आहेत. शुक्रवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे, आमदार नितेश राणे, शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांनी शिर्डीत येवून साईबाबांचं दर्शन घेतलं.
साईबाबांच्या कृपेने निकाल चांगला लागेल : साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी या महामंत्राचं आपण पालन केलं तर जीवनात अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. आईची खूप इच्छा होती की अष्टविनायक, रेणुकामाता आणि शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्याची. त्यामुळं तीन दिवसांचा वेळ काढून आईबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी आली असल्याचं भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. निवडणूकीच्या 70 दिवसात खूप कष्ट घेतले. आता येणाऱ्या 4 जून रोजी निकाल साईबाबांच्या कृपेने चांगला लागेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
राणेंची ठाकरेंवर टीका : उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात कंपन्या राज्याबाहेर गेल्या. उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत असतील तर लंडनमधून परत येवू द्याचे का? याबद्दल महाराष्ट्रातील जनता विचार करेल. लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत असतील तर लंडनमध्येच ठाकरेंना पॅकअप करायला पाहिजे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा -