सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज सकाळपासून मतदान सुरू असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावं, अशी देवाजवळ प्रार्थना करतो," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागरिकांनी उष्णता वाढण्याच्या अगोदर मतदान करुन घ्यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीकडून नारायण राणे हे मैदानात उतरले आहेत. तर त्यांना महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांनी कडवं आव्हान दिलं आहे.
मी हुशार विद्यार्थी, अभ्यास करुन परीक्षेला बसतो : "मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली आहे की, अब की बार 400 पार. आमचे 400 खासदार निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणचा, तुमच्या हक्काचा उमेदवार दिल्लीत जातो. तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिलं, त्याप्रमाणं याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावं," अशी विनंती नारायण राणे यांनी केली.
देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत : देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढंही देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित आहे. सावंतवाडी मतदार संघातून 70 हजारांहून अधिकचा लीड नारायण राणेंच्या मागं उभा करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडीत सहकुटुंब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला, याप्रसंगी ते बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबीयांनी मतदानाचा अधिकार बजावला.
हेही वाचा :
- "स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ कळला नाही तो..."; विनायक राऊतांची नारायण राणेंवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024
- विनायक राऊतांचं डिपॉझिट जप्त करणार; नारायण राणे यांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- "...तर मी राजकीय संन्यास घेईन, विनायक राऊतांनी काळजी करू नये", रामदास कदम असं का म्हणाले? पाहा व्हिडिओ - Lok Sabha Election 2024