छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगानं जनावरांचा चारा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्ह्यात चारा बंदी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच राहावा याकरिता, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा नेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, "११ एप्रिलपासून बाहेरच्या जिल्ह्यात चारा घेऊन जाण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणांहून चारा छावणीबाबत विचारणा केली जात आहे. मात्र त्यामधे राजकीय हस्तक्षेप आणि त्याबाबत राजकारण पाहून सत्य परिस्थितीचा आधार घेऊन प्रस्ताव तयार केले जात आहेत. दुसरीकडे पाणी टंचाईबाबत दररोज आढावा घेतला जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील टँकर संख्या एक हजारांहून अधिक जास्त आहे."
चारा टंचाई होण्याची शक्यता- यंदा कमी पर्जन्यमान झाल्यानं मराठवाडा भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे. पुन्हा एकदा मराठवाड्यातील जनतेला टँकरवर तहान भागवण्याची वेळ आली आहे. त्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा भीषण अडचण निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याबाबत टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चारा वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ७४ हजार ७५२ मोठी जनावर आहेत. तर १ लाख ५८ हजार २५१ लहान जनावर आहेत. तर एकूण ६ लाख ३३ हजार ३ जनावरे आहेत. त्यांना रोज ३३२३ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. मागणीनुसार चारा जिल्ह्यात उपलब्ध असावा, याकरिता निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
चारा छावणीबाबत तपासणी करून निर्णय- "मराठवाड्यात मागील काही वर्षात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीची समस्या उद्धभवली. यंदा पुन्हा एकदा मराठवाड्यात दुष्काळाचं सावट घोंगावत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यानुसार कशा पद्धतीनं नियोजन करता येईल, याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. तर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चारा छावणीत राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय फायदा या सर्व गोष्टी बाजूला सारणार आहोत. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच प्रस्ताव तयार केले जातील," अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पाण्याच्या टँकरची संख्या वाढली- "मराठवाड्यातील जलसाठे दिवसेंदिवस आटायला सुरुवात झाली आहे. विभागातील सर्वात मोठे असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ १७% टक्के जलसाठा राहिला आहे. तर वेगवेगळे प्रकल्पातील जलसाठे कमी झाले आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये टँकरची संख्या १ हजारच्यावर जाऊन पोचली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी कपात सुरू झाली आहे. इतकच नाही तर उद्योगांना लागणाऱ्या पाण्याबाबत उद्योजकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर उद्योगांसाठी पाणी कपात करण्याबाबत निर्णय होईल," असेदेखील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
हेही वाचा-