ठाणे Lighting In Thane: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य दिव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. (Thane itself beautification) या सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या आयोजनांमध्ये राजकीय पक्षांनी मोठा पुढाकार घेतला असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकीकडे राजकीय पक्ष मोठ्यात मोठे रामभक्तीचे कार्यक्रम आयोजित करत असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीतून तब्बल 70 लाख रुपयांची विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचं प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.
सर्वच शहरांमध्ये विद्युत रोषणाई करण्याचे आदेश: रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत एका नेत्रदीपक सोहळ्यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशातून रामभक्तांचा ओघ अयोध्येकडे लागला आहे. यानिमित्तानं संपूर्ण देशात घराघरात दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. याचंच अनुसरण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सर्वच शहरांमध्ये विद्युत रोषणाई करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत.
पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही निविदा: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक उत्सवांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. त्यात 2023-24 च्या आर्थिक वर्षात 22 लाख 82 हजार इतका स्पील ओव्हर आहे. एवढा स्पील ओव्हर वजा करता विद्युत रोषणाईसाठी पुरेसा निधी महापालिकेकडे उपलब्ध नसताना देखील या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांनी निविदा मागवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
पुरेसा निधी नसतानाही लाखोंचा खर्च: श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राजकीय पक्षांनी मोठी जय्यत तयारी केली आहे. मोठमोठे कार्यक्रम आणि मिरवणुका ठाण्यात काढण्यात येणार आहेत; मात्र तिजोरीत पुरेसा निधी नसताना देखील महापालिका प्रशासनाने 70 लाखांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या स्वरूपात रोषणाईसाठी अर्थसंकल्पात तरतूद असली तरी या कार्यक्रमासाठी विशेष तरतूद उपलब्ध नसल्यानं विद्युत रोषणाई करणं या हेडखाली तरतूद केली गेली आहे, असं प्रशासनानं स्पष्ट केलं.
कुठे कुठे होणार रोषणाई? ठाण्यातील मंदिरांवर ही रोषणाई होणार आहे. यासोबत पालिका मुख्यालय आस्थापना, ठाण्याचे प्रवेश द्वार या सर्व वास्तूंवर ही विद्युत रोषणाई होणार आहे. वीज बिल प्रशासन भरणार आहे. दिवाळी सणाप्रमाणे ही रोषणाई होणार असून शहर सुंदर दिसण्यातही मदत होणार आहे.
हेही वाचा: