सातारा Leopard News : शेतामध्ये गवत कापत असताना एका तरुणावर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावात घडली. विजय रामचंद्र पवार (वय 37), असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि खांद्याला जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळं कराड तालुक्यातील शेतकरी भयभीत झाल्याचं बघायला मिळतंय.
तरूणानं केला बिबट्याचा प्रतिकार : कराड-रत्नागिरी मार्गावरील धोंडेवाडी गावातील विजय पवार हा तरुण बेंद नावाच्या शिवारात वैरण आणण्यासाठी गेला होता. ओढ्याकाठी गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. मात्र, यावेळी तरुणानं धाडसानं बिबट्याचा प्रतिकार केला. मोठमोठ्यानं आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बिबट्यानं तरुणाच्या डोक्यावर आणि खांद्यावर पंजा मारला. परंतु त्यातूनही तरुणानं जोरदार प्रतिकार केल्यानंतर बिबट्यानं तेथून धूम ठोकली.
वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव : बिबट्यानं पळ काढल्यानंतर विजय जखमी परिस्थितीत गावात आला. त्यानंतर लगेच ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अँटी रेबीज आणि टीटीचं इंजेक्शन दिलं. बिबट्यानं तरुणावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली. तसंच शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काय काळजी घ्यावी, याबद्दलच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले : बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. ऊस शेतीमुळं बिबट्यांच्या प्रजननास पोषक परिस्थिती असल्यानं बिबट्यांनी ऊस शेतालाच आपला अधिवास बनवला आहे. बिबट्यासह गवारेडा यांसारख्या वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर आणि हल्ले देखील वाढत चालले आहेत. त्यामुळं चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.
हेही वाचा -