पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार करण्यात आला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही ज्येष्ठ चेहेऱ्यांना डावलण्यात देखील आलं. मंत्रिमंडळात जरी 17 ओबीसी नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानं ओबीसी आंदोलक तसेच ओबीसी नेते महायुतीवर नाराज झाले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर छगन भुजबळ प्रकरणी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी अजित पवारांनीच छगन भुजबळांचा बळी घेतला, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
ओबीसी समाजाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना छगन भुजबळ यांच्याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की "खरं म्हणजे ओबीसी समाजाचा अनादर करण्यात आलेला आहे. आम्ही महायुतीच्या बाजुनं जाणार आहोत, असा आम्ही निवडणुकीच्या आगोदरच ठामपणे निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजानं महायुतीला भरभरून मतदान केलं. असं असताना ओबीसी समाजाचा आवाज बनणारे गोपीचंद पडळकर तसेच छगन भुजबळ यांना का डावलण्यात आलं आहे. अजित पवार यांनी जे अडीच वर्षाचं सांगितलं आहे, तर अडीच वर्षानंतर ते उपमुख्यमंत्री पद हे छगन भुजबळ यांना देणार आहे का, ? आणि जर ते देणार असतील तर त्यांनी तसं सांगावं," असा सवाल यावेळी हाके यांनी केला.
छगन भुजबळ, गोपीचंद पडळकरांना डावलल्यानं नाराजी : "एकीकडं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिल्याचा आनंद आहे. पण दुसरीकडं छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्यानं या महायुती सरकारनं ओबीसी समाजाचा रोष ओढवून घेतला. सरकारनं मंत्रिमंडळात अनेक ओबीसी चेहरे जरी दिले असले, तरी आम्हाला समाज म्हणून मंत्रिमंडळात छगन भुजबळ पाहिजे होते. पण त्यांना न घेतल्यानं ओबीसी समजाचा अनादर झाला," असं यावेळी हाके म्हणाले.
जयंत पाटील, रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भुजबळांचा बळी : "गेल्या काही दिवसांतील राजकारण पाहता, अजित पवार यांनी रोहित पवार, जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भुजबळ यांचा बळी दिला आहे का असा सवाल आम्हाला उपस्थित झाला आहे. अजित पवार हे दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी बहीण सुप्रिया सुळे यांना भेटत नाहीत. पण शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार सर्वांना घेऊन जातात, हे मिलीभगत नाही का ? तसेच जनतेच्या मनात धूळ फेकण्याचं काम अजित पवार हे करत आहेत. लढायला आम्ही पण तुपाशी जेवणासाठी इतर लोक असून छगन भुजबळांना का डावलण्यात आलं आहे, याच उत्तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी द्यावं," असं यावेळी हाके म्हणाले.
हेही वाचा :