सातारा Ladki Bahin Yojana Ratnagiri : साताऱ्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बस रत्नागिरीला मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सर्व डेपोमधून 144 गाड्या रत्नागिरीला गेल्यामुळं साताऱ्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
सातारा जिल्ह्यातील 144 गाड्या रवाना : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा रत्नागिरीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी आगारांची आणि एसटी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातून एसटी बस मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा, कराड आणि फलटण या मोठ्या आगारांतून प्रत्येकी 20 आणि पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, वडूज, दहिवडी आणि खंडाळा या आगारांतून प्रत्येकी 12 एसटी बस रत्नागिरीला रवाना झाल्याची माहिती कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांनी सांगितलं.
- सातारा जिल्ह्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं : तीन दिवसांसाठी 144 एसटी बसेस रत्नागिरीला गेल्यामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी सेवेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गावांच्या फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं नोकरदार, ज्येष्ठ नागरीक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
प्रवाशांना खासगी वडापचाच पर्याय : तीन दिवस एसटीच्या फेऱ्या बंद राहणार असल्यानं वयोवृद्ध प्रवाशी आणि पासधारक विद्यार्थ्यांना वडापचाच आधार घ्यावा लागणार आहे. मंगळवारी दुपारपासून अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं बसस्थानकांवर अनेक प्रवाशी ताटकळून गेले. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. गाड्या रद्द झाल्याचं कळताच प्रवाशांनी खासगी वडापचा आधार घेत घर गाठलं.
सातऱ्यातील कार्यक्रमासाठी 400 एसटी बसेस बुक : दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नेण्यासाठी शिंदे सरकारनं 400 एसटी बस बुक केल्यानं ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. त्यामुळं सामान्य प्रवाशांचे हाल झाले. तसंच दुर्गम भागातील नागरिकांना खासगी वडापचा आधार घ्यावा लागला.
हेही वाचा -
- पुन्हा संधी दिल्यास लाडक्या बहिणींना 90 हजार देणार - अजित पवार - Ajit Pawar
- "...तर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार", मुख्यमंत्री शिंदेंचं लाडक्या बहिणींना आश्वासन - Ladki Bahin Yojana
- सातारा, कराडात पावसाची दमदार हजेरी, भात पिकांना मिळाली संजीवनी, मुख्यमंत्र्यांची होर्डींग मात्र पडली, पाहा व्हिडिओ - Satara Rain News