देवगड Kunkeshwar Yatra : दक्षिण कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरवात झालीय. यावर्षीचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आला होता. शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या केल्या जातात. कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई नेहमीच लक्षवेधी ठरत असते. आंगणेवाडीप्रमाणे या जत्रोत्सवात देखील राजकीय नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळते.
शासकीय पूजेनंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या : आंगणेवाडी यात्रेनंतर भक्तांना वेध लागतात ते कुणकेश्वर यात्रेचे. या यात्रेला आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय पूजेनंतर सुरुवात करण्यात आली. मध्यरात्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत कुणकेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पूजा झाली. यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कुणकेश्वर यात्रेनिमित्त प्रशासन सज्ज झालं असून प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलीय. कुणकेश्वर यात्रा तीन दिवस सुरू राहणार असून या यात्रेसाठी लाखो भाविक मंदिरात उपस्थित राहणार असल्याचं देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलंय.
उद्योजक किरण सामंत याना प्रथम निमंत्रण पूजेचा मान : दक्षिण कोकणाची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवास शुक्रवारी मध्यरात्री उत्साहात प्रारंभ झाला. रात्री 12 वाजेनंतर देवस्थानचे पूजारी, मानकरी यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची पूजा झाल्यावर प्रथम निमंत्रण पूजा मान रत्नागिरी येथील उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते पूजा पार पडली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सुधीर जाधव, स्नेहल जाधव, अतुल रावराणे, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी पूजा करून दर्शन घेतलं. त्यानंतर आरती झाल्यानंतर मंदिरात भाविक शिवभक्तांना दर्शनाकरता सोडण्यात आलं.
किरण सामंत यांना प्रथम निमंत्रण पूजेचा मान मिळाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांना कुणकेश्वर देवस्थानच्या वतीनं प्रथम निमंत्रण म्हणून पूजेचा मान देण्यात आला. उद्योजक किरण सामंत यांनी निमंत्रक म्हणून पूजा केल्यानंतर दीपक केसरकर यांनी शासकीय पूजा करत आरती केल्यानंतर भाविकांना दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचा देवस्थानच्या वतीनं शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला. मात्र उद्योजक किरण सामंत यांना प्रथम निमंत्रण म्हणून पूजेचा मान देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना होत आहेत.
हेही वाचा :