मुंबई Konkan Lok Sabha Election Results 2024 : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर हे कोकण किनारपट्टीचे जिल्हे म्हणजे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असं चित्र होतं. शिवसेना पक्षाचे पारंपरिक मतदार संघ म्हणून या मतदारसंघांकडं पाहिलं जात असे. मात्र, या निवडणुकीत हे चित्र पूर्णतः बदलल्याचं पाहायला मिळालं. कोकणातील केवळ एक भिवंडीची जागा वगळता सर्व जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधील एकूण सहा जागांपैकी पाच जागा महायुतीनं मिळवल्यात.
काय आहे कोकणातील समीकरण : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पारंपरिकरित्या निवडून येत होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे पुन्हा या मतदारसंघावर आपली मोहर उमटवतील अशी चर्चा असतानाच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजूनही कोकणात आपलं वर्चस्व आहे हे सिद्ध केलं. त्या पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील रायगड मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गिते यांना पुन्हा एकदा धूळ चारत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि ठाणे शहर या दोन्ही जागा राखण्यात शिवसेनेला (शिंदे) यश आलय. ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला यावेळी विजय मिळवता आला नाही. तर पालघर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडी यांचा महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी पराभव केलाय.
भिवंडीत युतीला धक्का : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान मंत्री आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांनी पराभव केलाय. एकूणच उर्वरित महाराष्ट्रात महायुतीला जरी जोरदार धक्का बसला असला तरी कोकण किनारपट्टीवर मात्र महायुतीनं आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवलंय. कोकणातील शिवसेना पक्षाचा असलेला मतदार आणि ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाखाली असलेली ताकद यामुळच हे शक्य झालंय, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केलं.
उर्वरित महाराष्ट्रात युतीचा धुव्वा : तर या पाच जागा वगळता उर्वरित महाराष्ट्रात महायुतीला केवळ 13 जागांवर समाधान मानावं लागलं असून महाविकास आघाडीला उर्वरित महाराष्ट्रात 29 जागा मिळवता आल्या आहेत. त्यामुळं भाजपाचा गड समजला जाणाऱ्या विदर्भातही भाजपाची दोन जागा मिळवताना दमछाक झालेली पाहायला मिळाली.
हेही वाचा -
- मोदींच्या विरोधात जनादेश, INDIA आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाना - INDIA Alliance Meeting
- लोकसभा निवडणूक निकाल 2024: 'या' सात मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का, का पडले दिग्गज? घ्या जाणून - Lok Sabha Election Results 2024
- देवेंद्र फडणवीसांचं फडतूस राजकारण; एनडीएच्या खासदारांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा - Sanjay Raut On Devendra Fadnavis